Lesson Learned 2

Insecurity माणसाला आतून बाहेरून पोखरून टाकते. विशेषतः नवीन लग्न झालेल्या मुलांच्या आयांना. त्यांना सतत असं वाटत असतं की आपला मुलगा "हल्ली काही खातच नाही." किंवा "त्याला हल्ली माझ्या हातचं आवडतच नाही." किंवा "किती बदलला आहे माझा मुलगा...!" किंवा "सासरचंच सगळं गोड वाटतं हल्ली त्याला." वगैरे वगैरे...

आपल्या मुलाच्या आयुष्यात दुसरी स्त्री आली की ह्यांची धुसफूस, चडफड सुरु. कधी कधी ती बाहेर निघतेही, पण कित्येक बाबतीत ती त्यांच्या मनातल्या मनातही राहात असेल. माझ्या सासूबाईंपासून ते नात्यातल्या अनेक स्त्रियांपर्यंत सगळीकडे हाच पॅटर्न मी बघते. माझं लग्न होण्यापूर्वी मला ही दृष्टीच नव्हती कारण माझे आजी-आजोबा माझ्या काकांसोबत राहतात. लग्नानंतर एकेक कडू-गोड अनुभव घेऊन जसजशी नजर तयार झाली तसतसं अश्या "सासू" ह्या रोलमध्ये एकदम घुसून, तोच-तो एक दृष्टिकोन घेऊन जगणाऱ्या स्त्रियांबद्दल मला खूप कुतूहल वाटत आलंय आणि प्रश्न पडलेयत. 


मला वाटतं की अश्या स्त्रियांचं जगणं हे ठराविक फेजेसमध्ये विभागलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ, त्यांच्या लग्नापूर्वीची फेज, त्यांच्या लग्नापासून ते मुलाच्या लग्नापर्यंतची फेज, आणि मुलाच्या लग्नानंतरची सासूपणाची फेज. ह्या तीन फेजेसमध्ये  सगळं बसतं, आणि मग त्याच दृष्टिकोनातून आजूबाजूला चाललेल्या सगळ्या घडामोडींकडे त्या बघतात. प्रत्येक फेजमध्ये आधीच्या फेजमधल्या फक्त सोयीस्कर घटना ह्यांना आठवतात. म्हणजे समजा ह्या आपल्या सासूच्या पुढे-पुढे करत असतील तर त्यांच्या सुनांनीसुद्धा त्यांच्या मागे-मागे फिरलं पाहिजे, नव्हे प्रत्येक निर्णय त्यांच्या परवानगीनं, सांगून-सवरून घेतला पाहिजे. उलटपक्षी, आपण आपल्या सासवांना कितीही घालून पाडून बोलत होतो ते विसरतील, आणि आपल्या सुनेनं आपल्याला आदरानं वागवावं अशी अपेक्षा ठेवतील. आपण आपल्या नवऱ्याकडून हवी ती मदत घेतील, पण सुनेला तिच्या नवऱ्यानं मदत केली म्हणजे जणू तिनेच त्याला "कामाला जुंपलंय" असा आविर्भाव असेल. अशी एक ना अनेक उदाहरणं देता येतील.


ह्या सगळ्यामागे एक अत्यंत चुकीचं assumption ह्या स्त्रिया करतात आणि स्वतःचंच जगणं मुश्किल करून ठेवतात, ते म्हणजे - "माझा मुलगा मुळात बदलूच शकत नाही. त्यातून तो बदललाच तरी मला  योग्य वाटेल तितकाच बदलला पाहिजे. आणि त्यापलीकडे बदल झाला म्हणजे आभाळच कोसळलं जणू." ह्यांच्यापैकी फार कुणी introspect करायला जात नाही की आपण असा विचार नक्की का करतोय, ह्यातून आपल्याला काय मिळतंय...


Anyway... एकतर होणाऱ्या कोणत्याही त्रासाचं मूळ सभोवतालच्या परिस्थितीत शोधणं खूप सोप्पं आहे. आणि introspection is easier said than done. त्यामुळे आपल्याला जे वाटतंय त्याच्याशी आमने-सामने deal ना करता बहुतेकवेळा सगळं खापर मुलावर, सुनेवर किंवा क्वचित स्वतःच्या दैवावर फोडून मोकळं होणं अश्या स्त्रियांना सोप्पं जात असावं. आणि एकदा का स्वतःच्या भावनांची जबाबदारी झटकून टाकली की मग त्यातून होणाऱ्या परिणामांची काळजीपण इतरांनीच वाहावी अशी अपेक्षा तयार व्हायला लागते, आणि अपेक्षा म्हंटलं की अपेक्षाभंग जवळजवळ अटळ आहे. So त्यातून आपली अस्वस्थता आपणच exponentially वाढवून घेतो हे कुणाला दिसत नाही बहुतेक. 


असो. ह्यातून मी घेतलेला धडा एकच... की मी सगळ्यांना बदलायला जाऊ शकत नाही, पण स्वतःला नक्की बदलवू शकते. नात्यांच्या बाबतीतच नव्हे तर रोजच्या छोट्या-मोठ्या गोष्टींमध्येही मी माझी जबाबदारी कधीच टाळणार नाही. विशेषतः माझ्या मनातल्या भावनांची जबाबदारी माझीच असेल. त्या क्षणी त्या प्रसंगाशी deal करणं कितीही अवघड वाटलं तरी! वाटलंच तर मदत मागण्याची जबाबदारीसुद्धा माझीच असेल. No one can help me until I help myself. अश्या attitudeमुळे माझं स्वतःचं आणि माझ्या भोवतालच्या सगळ्यांचं आयुष्य थोडंजरी सुखाचं झालं तरी  पुष्कळ आहे, नाही?

Comments

  1. Good observation and great lesson!!! Khup neet mandlays....you are a good counsellor.😃

    ReplyDelete
  2. ग्रेट, इतके सरळ सरळ लिहिणे खरंच खूप धाडसी आहे, तूच ते करू शकतेस.

    ReplyDelete
    Replies
    1. धाडसाचं माहीत नाही, पण आजूबाजूची परिस्थिती बघून माझ्यापुरतं मी शिकणं नक्कीच शक्य आहे. त्याच त्या पद्धतीनं वागून मी स्वतःलाच त्रास करून घेण्यात काय point आहे नं?

      Delete

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *