केल्याने देशाटन

मला आणि रोहितला (माझा नवरा) फिरायला, किंबहुना जरा हटके अनुभव घेत केलेलं traveling आवडतं हे आमचं आम्हाला कधी कळलं, ते आता नेमकं सांगता यायचं नाही. पण न्यूझीलंड हे त्याचं मोठं कारण नक्की आहे. आम्ही दोघं जेव्हा आमच्या फिरण्याच्या आवडीबद्दल बोलायचो तेव्हा हटकून न्यूझीलंडचं नाव त्यात यायचंच यायचं! लग्नानंतर हनीमूनला तिथं जाण्याइतपत पैसे नव्हते त्यामुळे भारतातच कुठेतरी जाण्यावाचून गत्यंतर नव्हतं. मग त्यातल्या त्यात जिम काॅर्बेट-कौसानी-नैनिताल अशी ट्रिप काढली! पण न्यूझीलंडचं खूळ काही केल्या डोक्यातून जात नव्हतं. 


कौसानी


न्यूझीलंड हे तसं भारतीय पर्यटकांसाठी novel ठिकाण आहे. आम्ही तिथं जायचा प्लॅन केला तेव्हा आमच्या ओळखीचं कुणीच तिकडे गेलेलं नव्हतं. आम्ही जाणार म्हणाल्यावर बहुतेकांनी “काय आहे तिथं?” असं विचारलं. जाऊन आलो, आणि एक किडा चावल्यासारखं झालं. पुढचे प्रवास, पाहण्याची ठिकाणं, तिथली राहण्याची सोय, तिथले खास पदार्थ हे सगळं शोधण्यात आमचे दिवस-दिवस जायला लागले. यू.एस.ला राहायला आल्यावर तर रानच मोकळं मिळालं. इथं प्रत्येक राज्यागणिक निसर्ग वेगवेगळा दिसतो... त्यामुळे आम्ही जवळपास ठरवूनच टाकलं की एकावेळी एक अशी अमेरिकेतली राज्यं फिरायची. 


ते असो. सांगायचा मुद्दा हा की ह्या दरम्यानच्या २-३ वर्षांत आमच्या ओळखीतली अनेक मंडळी घराबाहेर, देशाबाहेर पडून “travel-friendly” झाली. बहुतेकांनी त्याच त्या, असंख्य टूरिस्टांनी पाय लावून गुळगुळीऽऽऽऽऽत केलेल्या ठिकाणी जायला सुरुवात केली. केरळ, गोवा, नैनिताल, सिमला, मनाली...आताशा फेमस झालेलं राजस्थान, लेह-लडाख इ... नाहीतर बाहेर म्हणजे फार फार तर सिंगापूर-मलेशिया किंवा लंडन, माॅरिशस, स्वित्झर्लंडसारखी तद्दन बाॅलिवुडी ठिकाणं! 


अर्थात ह्या सर्व जागा भेट देण्यासारख्या आहेतच, पण प्रत्येक ठिकाणाचे चांगले शंभरएक फोटो Instagram किंवा Facebook वर upload केल्याविना ह्या लोकांची एकही ट्रिप पूर्ण होताना दिसत नाही. कोणत्यातरी टूरकंपनीतर्फे योजलेल्या ट्रिपमध्ये भरमसाठ पैसे देऊन सामील व्हायचं, धाव-धाव करत “पाॅईंट्स” पाहायचे, भोज्याला शिवल्याप्रमाणे तिथली “मेमरी” (हाही ह्या अश्या पर्यटकांचाच ठेवणीतला शब्द!) म्हणून चार फोटो काढायचे, ते कमी पडतात की काय म्हणून दोन सेल्फींची
पण भर त्यात टाकून पळायचं पुढे! म्हणजे ट्रिपला गेलेत म्हणून फोटो काढतायत की फोटो काढायचे म्हणून ट्रिपला गेलेत अशीच शंका बघणाऱ्याला यावी. 

टूरकंपन्यांनी अशा pseudo-travelers ची नस चांगलीच ओळखलीय् मात्र! अनेक ठिकाणच्या टूर्सचं schedule पाहिलं की नियोजन करताना कंपनीची माणसं “कसं गंडवलं” म्हणून फिदीफिदी हसत असावीत असंच वाटतं. “युरोप टूर” हा पण असाच एक फसवा कारभार. १५ दिवसांत १० देश वगैरे! कसं शक्य आहे? पण त्या तशा ट्रिप्सना जाऊन आलेल्यांना नेमकं त्याच गोष्टीतून समाधान मिळालेलंही दिसतं. 
मुळात प्रवास का करायचा हे, आणि प्रवास व सहल ह्यातला फरक ह्या दोन्ही गोष्टी  न कळूनही बहुतेकांना हल्ली आपण कसे #travelers #nomads आहोत न् कसे आपण #experiences घेतो हे आपापल्या social media वरच्या #traveldiaries मधून जगाला दाखवायचं असतं! 

अर्थात् ते जे असेल ते असो... पण खरंच! मुळातच का निघायचं प्रवासाला? कुठेही जातो तिथं जाऊन काय केल्यानं जाण्याचं सार्थक होतं? प्रवास, सहल आणि पर्यटन ह्यात नेमका फरक काय? 
मी सुरुवातीला उल्लेख केला त्या आमच्या न्यूझीलंडच्या प्रवासापासून हे प्रश्न माझ्या मनात जे ठाण मांडून बसले, ते जात जात नव्हते. मागच्या आठवड्यात वॉशिंग्टन राज्यात सिएटल आणि ऑलिम्पिक नॅशनल पार्कला भेट देताना ह्यातले काही प्रश्न माझे माझ्यापुरते तरी सुटताहेत असं वाटलं. 


New Zealand


मी आणि रोहित जेव्हा कुठेही जातो तेव्हा off the beaten path ठिकाणांची वारी करण्याकडे आमचा कल असतो. म्हणजे साऊथ न्यूझीलंडला गेलो तेव्हा आम्ही तिथला फेमस असलेला ग्लेशियर वॉक न करता ट्विझल आणि जेराल्डीनसारख्या छोट्या छोट्या गावातून फिरलो. क्वीन्सटाऊनला जाऊन स्कायडायविंग करण्याऐवजी छोट्याश्या ओआमारूमधली ब्ल्यू पेंगविन कॉलनी बघणं पसंत केलं. किंवा अमेरिकेतही व्हरमॉंटसारख्या राज्यात फिरताना कार भाड्यानं घेऊन जिथं स्थानिक लोकांशिवाय कुणी सापडतही नाही अशा छोट्या-छोट्या गावात मुक्काम करत करत ८ दिवस फिरणं आम्हाला जास्त आवडलं. 




Vermont in Fall

Local दुकानांत जाऊन तिथे येणाऱ्या इतर व्यक्तींशी किंवा वाटेत भेटणाऱ्या स्थानिक मंडळींशी बोलून चुकून एखादी unique गोष्ट करायला मिळाली तर त्यासारखं दुसरं सुख नाही असं आम्हाला वाटतं. कारण वेगवेगळे देश, तिथल्या भाषा, संस्कृती, कपडे, निसर्ग ह्या सगळ्यात आत खोलात शिरण्यासाठी तुम्ही नुसतं एखाद्या बसमध्ये बसून नाही चालत! आणि देशाटन केल्याने येणारं अपेक्षित असलेलं चातुर्य हे ह्या सगळ्यांच्या खोलात शिरल्याशिवाय नक्कीच येत नाही. युथ हॉस्टेल्ससारखी जबरदस्त कल्पना अशा विचारातूनच जन्माला येत असावी. समविचारी प्रवासी भेटले की आपला प्रवासाचा अनुभवही एका वेगळ्याच level ला जाऊन पोहोचतो. इतरांचे विविध अनुभव आणि perspectives ऐकूनच तर आपण enrich होत असतो, बदलत असतो, प्रगल्भ होत असतो. माझ्या दृष्टीने भटकंती करायची ती ह्या सगळ्यासाठी!

टूरकंपन्यासुद्धा त्या त्या देशातले  अनुभवच आपल्याला देतात. पण माझ्या मते तो अतिशय सीमित, ज्याला आपण controlled environment म्हणू, अशा पद्धतीने दिला जातो. त्यात ना आपलं क्षितीज विस्तारत, ना आपल्याला त्या देशातल्या स्थानिकांची नीट माहिती होत. एखाद्या ठिकाणी जाऊन तिथं स्वतःची पाळ-मुळ विसरून नव्यानं आपले दृष्टिकोन घडवणं ह्यात जी मजा आहे, जे आव्हान आहे, ते अशा controlled वातावरणात घेतल्या जाणाऱ्या अनुभवात नाही. प्रवास करायचा तो अशा आव्हानांसाठी!

शिवाय आपल्यासाठी सगळं प्लॅनिंग करणारी टूरकंपनी गाठीशी नसली की मग अख्या प्रवासाची आणि त्याच्याशी निगडीत घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी आपल्यावरच पडते. शांत डोक्याने प्रवासात येणारे अनपेक्षित प्रश्न सोडवत, त्याचीही मजा घेत पुढे जाणं हासुद्धा एक अनुभव आहे. निम्मी मजा तर प्रवासाच्या आधी त्याचं foolproof नियोजन करण्यातच आहे! काहीजण असं नियोजन न करताही सरळ प्रवासाला निघतात, पण आम्ही अजून त्या पातळीला पोहोचलो नाही. लहान मूल घेऊन असं adventure करण्याची हिंमत होत नाही इतकंच. पर्यटन, तेही self-planned, करायचं ते ह्या सगळ्या अनुभवांसाठी आणि आपल्या मर्यादा ओळखण्यासाठी!

आमची आता travel destinations ची bucket list दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. एकेक करून ती पूर्ण करणे हा तूर्तास मोठा challenge आहे. आमच्या मर्यादा आता तिथंच आम्हाला न दिसोत म्हणजे झालं!





Comments

  1. Pravasabaddalchi post ani ekdahi wanderlust wala hashtag nahi ! Nishedh aso :D

    ReplyDelete
  2. Hmmmm barech diwas asa kahitari vatata hota ki प्रवास, सहल आणि पर्यटन ह्यात नेमका फरक काय? Pn mandata yet navata.....vachum vatala ,yes asach kahitari hota dokyat. Ajun ek gosht, me n Sanjog Japan madhe firayala laglyapasun ajun ek gosht zali ki aamhi barypaiki japanese dishes atleast try karayla lagalo, ata we can manage a trip of 2-3 days without indian food (Tula tr mahitey Sanjog kiti particular aahe tyachya khanayabadal ��) PN tatihi ulat ata Kahi japanese dishes aamhala Awadatat ☺

    ReplyDelete
  3. Masta lihila abwa blog👏👍 Hostel chi concept mala hi avadte.. Bhatkanti lokacha aada aahe hostel😀..vegveglya stories aani traveler lokanche perspectives eikala miltat.
    Travelling Cha planning ek motha task aahe😱 Lagana zalaynanter planning Cha mahatav jasta kalayla lagla aahe 😀 and am enjoying it🙂
    Travelling ka karava? Kahi loka peace sathi bhatkanti kartat, kahi kahina nisargachya sathi madhe dhunda hoyche asta, kahi kahi na Trevor Noah sarkha non English speaking deshamadhe phirnyamadhe thrilling gheycha aasta.. vegvegle foods, vegveglya bhasha, chaliriti bhagychya astat...Etx aaso Karana kitihi aasli tari Travelling madhun milnara Anand ha veglcha aasto🙂. Manachya padyawar athavani sodun janara ha pravas aasto...

    ReplyDelete

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *