The "Chew and Pour" Method!

आजच्या पोस्टमधून मी एक वेगळीच कथा मांडतेय. शिक्षणाची.

मी ऑफिसला जाता-येताना वेगवेगळे audiobooks किंवा podcasts ऐकत असते. ऐकून ऐकून त्यातले काही podcasts मला अतिशय आवडायला लागलेत. त्यांचे नवीन episodes केव्हा प्रकाशित होतायत आणि मी कधी एकदा ते ऐकतेय असं मला होत असतं. त्यापैकीच एक म्हणजे NPR Rough Translation. अमेरिकेत न राहणाऱ्यांसाठी सांगते - इथला NPR,अर्थात National Public Radio, म्हणजे आपल्याइथल्या All India Radio सारखं आहे. लोकांच्या donation मधून NPR ला funding मिळतं. अमेरिकेतल्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या frequency ला ह्या radio channel ची प्रादेशिक आवृत्ती रोज प्रसारित होते. त्यानुसार कार्यक्रमांची रूपरेषा वेगवेगळी असते, बातम्या प्रादेशिक असतात. इथली नवीन पिढी radio पासून दूर जात असल्यामुळे म्हणा किंवा इतर माध्यमं पुढे येत असल्यामुळे म्हणा, ह्या radio वाल्यांनी स्वतःचे असे वेगवेगळ्या विषयांवरचे podcasts सुरु केलेत. त्यापैकीच हे एक - Rough Translation.

ह्या podcast चा विषय कळायला अगदी सोपा पण वळायला कठीण! जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानामुळे अतिशय वेगाने आकुंचन पावणाऱ्या आजच्या जगात आपण बघता बघता आत्मकेंद्रित होतो आणि आपल्या इतक्या जवळ आलेलं जग विसरून एखाद्या विषयावर आपल्या-आपल्यातच उहापोह करत बसतो. ह्यातून तयार होणाऱ्या संकुचित मनोवृत्तींशी सामना करण्यासाठी हे podcast आपल्या ओळखीचेच असे विषय घेतं आणि जगाच्या दुसऱ्याच कोणत्यातरी कोपऱ्यात त्याविषयी काय चर्चा चालू आहे, कामगिरी चालू आहे ते आपल्यासमोर आणण्याचं काम करतं. ते ऐकता ऐकता जाणीव होत जाते, की विषय कोणताही असो, problem कोणताही असो, आपल्याप्रमाणेच जगाच्या पाठीवर इतरही कुणालातरी तंतोतंत तसाच अनुभव आलेला असतो आणि कदाचित त्यावरचं solution आधीच निघालेलंही असू शकतं. गरज असते ती आपण ते पाहण्याची, मान्य करण्याची आणि त्यातून काहीतरी शिकण्याची.

तर ह्या आठवड्यातल्या podcast विषयी मला लिहावंसं वाटलं, कारण त्याचा विषय होता "शिक्षणपद्धती". आपण सर्वांनी शाळेत जाऊन, एका वर्गात बसून शिक्षण घेतलंय. भारतातल्या पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीचा नाश तर केव्हाच झालाय. आणि सर्व जगात थोड्याफार फरकाने शिक्षणाचा एक साचा ठरून गेलाय - मॉंटेसरी, केजी, प्राथमिक-माध्यमिक शाळा, आणि मग कॉलेज शिक्षण.

Podcast मध्ये विशद केल्याप्रमाणे आफ्रिकेतल्या घानामध्येसुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही. किंबहुना तिथं हा साचा इतका पक्का बसलेला आहे की हल्ली तर तिथले बरेच पालक आपल्या १-१.५ वर्षाच्या मुलाला/मुलीला करियरच्या स्पर्धेत उतरवतात. Day care नव्हे, पाळणाघर नव्हे, तर proper शाळेत घालतात. त्यात मग घरचा अभ्यास, परीक्षा, मार्क हे सगळं ओघाओघानेच आलं. पालकांची अपेक्षा असते की ३ ते ५ वर्षाच्या मुला-मुलींना मातृभाषेतला आणि इंग्रजीतला मजकूर न अडखळता वाचता यायला हवा, साधीसुधी गणितं सोडवता यायला हवीत. तिथं गल्लोगल्ली अश्या अभ्यासक्रमयुक्त शाळा निघतायत. देशभरातल्या वय वर्ष २ ते ३ च्या आसपास असलेल्या साधारण ८०% मुला-मुलींनी अशा शाळांमध्ये प्रवेश घेतलाय. हे प्रमाण अमेरिकेपेक्षाही दुपटीने जास्त आहे!

वाचून हे सगळं ओळखीचं वाटतंय नं? मलाही ऐकताना वाटलं. आपण आपल्याकडेसुद्धा मुलांच्या दप्तराचं वाढलेलं ओझं, शाळेतला वाढत वेळ, मार्क मिळवण्यासाठी क्लासेसचं आलेलं पीक ह्याविषयी वाचत असतो, ऐकत असतो, प्रत्यक्ष अनुभवत असतो. आपल्याकडेही गल्लोगल्ली "नर्सरीज्" बोकाळल्या आहेतच. छोट्या-छोट्या मुलांना आपल्याही इथले पालक दप्तरं घेऊन ह्या नर्सरीवजा शाळांमध्ये पाठवत असतात. ह्या सगळ्यात मुलं नक्की समजून उमजून शिकतात किती, आणि रट्टा किती मारतात ह्याकडे कुणाचंच लक्ष नसतं.

घानाच्या सरकारनं ह्यावर एक नामी उपाय काढला. त्यांनी Innovations for Poverty Action (IPA) नावाच्या एका संस्थेला ह्याविषयी संशोधनपूर्ण अभ्यास करायला घानात बोलावलं. त्यांच्यापुढं असा प्रश्न ठेवण्यात आला की इतक्या प्रचलित झालेल्या छोट्या मुलांच्या शाळांमुळे मुलांच्या ज्ञानात, समजुतीत, एखादा विषय समजून घेण्याच्या क्षमतेत काही फरक पडतोय का. समाजशास्त्रात आणि एकंदरीतच वैज्ञानिक संशोधनात मान्यता असलेल्या Scientific Method आणि controlled study methods चा वापर करून ह्या संस्थेच्या लोकांनी मोठा उपक्रम राबवला. त्यातून असं सिद्ध झालं की मुलं शाळेत तर जातात, पण त्यातून ते constructive असं काही शिकत नाहीत.
स्मरणशक्तीच्या जोरावर पाठांतरावर भर देऊन एखादा विषय शिकणे-शिकविणे हीच घानातल्या शाळांची पद्धत. इतकी प्रचलित, की त्याला तिथं "Chew and Pour Method" असं खास संबोधनही आहे. आता या पद्धतीनं अपाय काय होतो असं विचाराल तर एका छोट्या उदाहरणातून स्पष्ट करते. IPA नं केलेल्या अभ्यासात त्यांनी एक भरपूर प्राणी असलेलं चित्र तिथल्या मुलांना दाखवलं आणि त्या चित्रात काय दिसतंय त्याचं वर्णन करायला सांगितलं. खोटं वाटेल, पण मुलं मख्खपणे बसून राहिली. त्याच मुलांना त्याच चित्राबद्दल दुसऱ्या पद्धतीने प्रश्न विचारले - म्हणजे दाखवायला सांगितलं कि चित्रात जिराफ कुठे आहे, वाघ कुठे आहे - तर ते त्या मुलांनी एकदम परफेक्ट दाखवलं. म्हणजेच याचा अर्थ त्या मुलांची शब्दसंपदा कमी नव्हती, तर "चित्रात काय आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं" यासारख्या open ended प्रश्नांची उत्तरं देण्याची क्षमता नव्हती. स्वतःहून विचार करून ते मांडण्याची क्षमता नव्हती. ह्यात वरकरणी अपाय काही नाही. पण ह्या साच्यात अडकून माणसाची सर्जनशीलता कमी होते. आणि हा effect तमाम जनतेवर झाला की तिथल्या innovation पासून नवीन businesses चालू करण्यापर्यंत सगळ्यांवर आपोआपच मर्यादा येत जातात.

घानाच्या सरकारनं ही समस्या ओळखली. त्यांच्या सांगण्यावरून IPA च्या लोकांनी घानाची राजधानी अक्रा येथल्या शाळांमध्ये शिक्षक प्रशिक्षणाची शिबिरं घेतली. Randomly ८० शाळा निवडून त्यातल्या शिक्षकांना interactive learning/teaching चे धडे दिले, जेणेकरून वाढत्या शब्दसंपदेचा वापर मुलं विधायक पद्धतीने स्वतःचे विचार आणि भावना मांडण्यासाठी करतील. शिक्षक आणि मुलांनी हा प्रयोग उचलून धरलेला असला तरी तिथल्या पालकांना काही अजून हे पटत नाहीये. थोडक्यात काय तर हे सगळं "फ्याड" आहे, आणि मुलांची शिस्त बिघडत चालली आहे असं बहुतेक पालकांचं म्हणणं आहे. घाना सरकार आणि IPA ला अजून तरी यावर उपाय सापडलेला नाही.

माझ्या दृष्टीनं आपल्याकडच्या नर्सरी स्कूल्समध्ये अश्या प्रकारचं interactive learning खूप चालतं. पण प्राथमिक शाळेपासून पुढच्या शिक्षणात ते सगळं असं काही गुल होऊन जातं की जणू काही त्याची गरजच संपली. बालवर्गात गोलात बसणारी मुलं अचानक रांगेत बाकांवर बसायला लागतात. तासाला दंगाच दंगा करणाऱ्या केजीतल्या मुलांना पहिलीत गेल्यावर अचानक तासाला शिक्षकांनी सांगितल्याशिवाय बोलायचं नाही हा नियम लावला जातो. इतक्या लहानपणचं आठवत नसलं तर इंजिनीरिंग-मेडिकलचे परीक्षांचे दिवस आठवा! कोणतीही गोष्ट मुळापासून समजावून, त्यामागची कारणमीमांसा देणं हे आपल्या शिक्षणपद्धतीत बसतच नाही. शिकण्याची गोडी लागणं तर दूरच. आम्हाला पाचवीत गणिताला एक शिक्षक होते जे गणिताचं पुस्तकच्या पुस्तक शब्दश: उतरवून द्यायचे. दर तासाला ते पुस्तकातून वाचणार आणि आम्ही लिहून घेणार असा scene असायचा! अतिशयोक्ती नाही. १००% खरं आहे.

असो. सांगायचा मुद्दा हा, की घाना काय आणि भारत काय, परिस्थिती साधारण सारखीच. आपल्या शासनकर्त्यांना निदान घाना सरकारसारखा एखादा professional study करून घेण्याची बुद्धी मिळाली तरी पुष्कळ झालं म्हणायचं! प्रत्यक्ष शिक्षणपद्धतीत बदल घडायला जादूच घडावी लागेल बहुतेक. तुम्हाला काय वाटतं?







Comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *