What's up, WhatsApp?

व्हॉट्सऍप वरून फिरणाऱ्या अफवांमुळे भारतभर सध्या जी काही धुमश्चक्री चालू आहे ती बघून depression च यायला लागलंय! गेला महिनाभर पेपरमध्ये अशा अफवांमुळे झालेल्या हिंसाचाराच्या बातम्या आणि त्यानंतर केंद्र सरकारनं व्हॉट्सऍपला बजावलेल्या नोटीसवर नोटीस एवढंच वाचतेय. व्हॉट्सऍपनं आधी फॉर्वर्डेड मेसेजेसना "forwarded" असा उघड-उघड टॅग लावला. पण व्हॉट्सऍप मीही वापरते आणि म्हणून १००% सांगू शकते की वाट्टेल ते मेसेजेस फॉरवर्ड केले जाण्याचं प्रमाण काही कमी झालेलं नाही. आता आज असं वाचतेय की ५ पेक्षा जास्त वेळा एकाच मेसेज फॉरवर्ड करता येणार नाही. पण त्या ५ व्यक्तींना किंवा ग्रुप्सवर तो मेसेज जातोच त्याचं काय करायचं? अफवांचं पीक अशा उपायांनी कमी होणार असतं तर किती सोपं झालं असतं सगळं!

मुळात आपलं सरकारसुद्धा व्हॉट्सऍपला नोटीस बजावून काय साध्य करू इच्छित आहे? नुसती वाहवा मिळवणं?

अशा अफवा पसरणं जर मुळापासून थांबवायचं असेल तर थोडा खोलवर विचार करणं आवश्यक आहे. मुळात व्हॉट्सऍपच्या मागचं तंत्रज्ञान काय आहे, तर end-to-end encryption. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पाठवलेला मेसेज इतर कोणीही मधल्या मध्ये intercept करून वाचू शकत नाही. खुद्द व्हॉट्सऍपसुद्धा नाही. मेसेज पाठवणाऱ्याची privacy बाळगली जाईल याची पूर्ण दक्षता यात घेतली जाते. त्यामुळं व्हॉट्सऍपनं असं encryption सुरु केलं यात व्हॉट्सऍप वापरणाऱ्या आपल्या सर्वांचा फायदाच होता.

पण व्हॉट्सऍपच्या माध्यमातून पसरणाऱ्या अफवा याच encryption मुळे मधल्या मध्ये कुणीही पकडू शकत नाही. व्हॉट्सऍपसुद्धा नाही! त्यामुळे सरकारला अपेक्षित आहे त्याप्रमाणं अफवा थांबवण्याची जबाबदारी जर व्हॉट्सऍपवर टाकली तर व्हॉट्सऍपला सरतेशेवटी encryption बंद करण्यावाचून गत्यंतर राहणार नाही. आणि encryption जर आपल्याला हवं असेल तर व्हॉट्सऍप स्वतः ह्या अफवा थांबवण्यासाठी एका limit च्या पलीकडे काहीही करू शकणार नाही.

म्हणूनच व्हॉट्सऍपनं पेपरमध्ये दिलेल्या जाहिरातींमध्ये सांगितलंय तसं आपल्यालाच एक जबाबदार नागरिक होणं खूप जरूरी आहे. त्यासाठी आपण काय करूया? तर इथून पुढे कोणताही मेसेज वाचताना जरा सारासार विचार करूया. कुठेतरी पाणी मुरतंय अशी आपल्याला थोडीजरी शंका आली, किंवा मेसेजमध्ये काहीतरी चुकीचं लिहिलंय असं वाटलं तर तो मेसेज पाठवणाऱ्याला प्रश्न विचारूया. हेही जमत नसेल तर निदान तो मेसेज आपल्याकडून पुढे पाठवला जाणार नाही ह्याची काळजी घेऊया. लोकांनी खतपाणी घालून पसरवलेल्या अफवांना ना व्हॉट्सऍप जबाबदार आहे, ना सरकार!





Comments

Contact Me

Name

Email *

Message *