पाहावं असं काही : यॉर्कशायर डेल्स

- इंग्लंड -
साधारण दक्षिणेकडे लंडन आणि कॉट्सवॉल्ड्स , आणि उत्तरेला लेक डिस्ट्रिक्ट व यॉर्क
ज्यांनी मला फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर फॉलो केलं त्यांना समजलंच असेल की आम्ही अशातच दोन आठवडे इंग्लंडची सफर केली. यंदा प्रथमच खूप कमी प्लॅनिंग करून प्रवासाला निघालो होतो. मोघम ठरवलं होतं की 'लंडन', 'कॉट्सवॉल्डस', 'लेक डिस्ट्रिक्ट' आणि 'यॉर्क' असे चार भाग (याच क्रमाने) फिरायचे. पण तिथं जाऊन नक्की काय पाहायचं, त्याला किती वेळ लागेल, याचं खूपच कमी प्लॅनिंग होतं. म्हणजे साधारण पाहायची ठिकाणं 'गूगल मॅप्स' वर 'स्टार' करून ठेवली होती इतकंच काय ते. बाकी सर्व हवेतच! पण हा मोघम प्लॅनही यशस्वी झाला. आम्ही मनसोक्त भटकलो... पायी, गाडीनं, रेल्वेमधून, बसने...  








- उत्तर इंग्लंड -
पश्चिमेला लेक डिस्ट्रिक्ट, मध्ये यॉर्कशायर डेल्स, पूर्वेला यॉर्कशायर मूर्स आणि मूर्सच्या दक्षिणेला यॉर्क शहर 
खरंतर कोणत्याही ट्रीपला जाण्यापूर्वी मी त्या ठिकाणाविषयी बरंच काही वाचते - म्हणजे त्या ठिकाणाचा इतिहास, तिथं हवामान कसं आहे, demographics वगैरे वगैरे. पण यावेळी तसं काहीसुद्धा करायला मला वेळ झाला नव्हता. आणि शाळेत भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास कोळून प्यायल्यामुळे "इंग्लंडचा काय इतिहास वाचायचा" असा माज कळत-नकळत मनात असावा की काय, कोण जाणे! लंडनचं आकर्षण मला कॉलेजमध्ये असल्यापासून होतं. शिवाय इंग्लंडला जातोय म्हटल्यावर लंडनला जाणं ओघाओघानं आलंच. मात्र इंग्लंडमधल्या इतर ठिकाणांबद्दल जेवढं काही वाचलं होतं त्यामुळे somehow मला दोन ठिकाणांविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झालं होतं - यॉर्क आणि कँटरबरी. त्यातलं कँटरबरी आमच्या itinerary मध्ये बसत नव्हतं. यॉर्क त्यामानाने टप्प्यात होतं त्यामुळे तिथं जायचंच या माझ्या हट्टाखातर आम्ही बाकी ठिकाणांसोबत यॉर्कचंही बुकिंग केलं होतं. याखेरीज यॉर्क शहराच्या जवळ दोन नॅशनल पार्क्स आहेत - यॉर्कशायर डेल्स आणि यॉर्कशायर मूर्स. तिथंही जायचं ठरलं. एमिली ब्रॉंटेचं वदरिंग हाईट्स (Wuthering Heights) वाचल्यामुळे यॉर्कशायर मूर्सचं नाव मी ऐकून होते, पण डेल्सबद्दल शून्य माहिती होती.


लेक डिस्ट्रिक्टहून यॉर्कला येताना यॉर्कशायर डेल्समधून यायचं, वाटेत वेन्सलीडेल क्रीमरी (ही खरंतर cheese factory आहे!) पाहायची, आणि हमरस्त्यानं गाडी न आणता आतले छोटे छोटे रस्ते पकडून यायचं असं ठरवून लेक डिस्ट्रिक्टहून निघालो. साधारण ३.५ तासांचा हा प्रवास आहे. अंतरं नकाशात खूप वाटली तरी प्रत्यक्षात कमी आहेत. त्यामुळे ३.५ तास लागायचे नाहीत याची आम्हाला जवळपास खात्री होती. पण कसलं काय! डेल्सच्या भागात शिरलो आणि अक्षरश: वेड लागायची पाळी आली! 


"डेल्स" (Dales) याचा शब्दश: अर्थ "दरी" असा होतो. छोटे छोटे डोंगर आणि मध्ये मोठमोठाल्या रुंद दऱ्या असा हा हिरवागार गवताळ प्रदेश आहे. जिथून निघालो होतो त्या लेक डिस्ट्रिक्टमध्येही सगळं हिरवंच होतं. पण ते सगळं जास्त करून "bottle green" रंगात रंगवलेलं. इथे सर्व काही bright lime green किंवा पोपटी! मधे वाटेत छोटी छोटी गावं लागत होती. आपल्याकडची गावकुसावरची मंदिरं, तसं तिथं प्रत्येक गावाच्या वेशीवर छोटंसं का होईना पण सुंदरसं चर्च दिसत होतं. भरपूर farm houses, tractors दिसत होते. घोड्यावरून जाणारे तिथले स्थानिक लोकही होते काही..! त्यांच्या मेंढ्या आणि गुरंढोरं मोकळेपणाने चरत होती. इथल्या जवळपास ९५% जमिनीवर स्थानिक लोकांचा मालकीहक्क आहे - privately owned. त्यामुळे प्रत्येक शेताला, चरण्याच्या area ला अगदी एकसारखी दिसणारी दगडी कुंपणं घातलेली होती. यॉर्कशायर डेल्स नॅशनल पार्क ऑथॉरिटीवर या कुंपणांची आणि इतर सार्वजनिक मालमत्तेची जबाबदारी आहे. तशाच मग तिथं एका शेतातून दुसऱ्या शेतात जाण्यासाठी पायवाटा आखलेल्या होत्या. त्याकरता प्रत्येक कुंपणात एक लाकडी gate ही केलेलं होतं. ह्या पायवाटा जिथून सुरु होत होत्या तिथं प्रत्येक ठिकाणी "public footpath" अशी पाटी लावलेली होती. म्हणजे ह्या वाटांनी कुणालाही ये-जा करता येणं शक्य होतं. गाडीचे रस्ते डोंगरांमधून जात असल्यामुळे अतिशय अरुंद आणि वळणावळणांचे... एक डोंगर चढून पलीकडच्या बाजूने दरीत उतरणारे... दरीत उतरताना लांबपर्यंत दिसणाऱ्या त्या दगडी कुंपणाच्या रेषा हिरव्यागार गवतावर उठून दिसत होत्या. चरणाऱ्या मेंढयांचे त्या गवतावर पांढरे ठिपके विखुरलेले दिसत होते... आमच्या गाडीचा वेग आता आपसूकच कमी व्हायला लागला होता. 


कुठं थांबू आणि कुठं नको असं व्हायला लागलं होतं आम्हाला! वेन्सलीडेल क्रीमरीला पोहोचायच्या आधीच वाटेत असंख्य ठिकाणी थांबून सगळी दृश्यं डोळ्यात साठवून ठेवत होतो. रस्ते तर इतके अरुंद, की चुकूनमाकून एखादी गाडी समोरून आलीच तर आपली गाडी बाजूला (डायरेक्ट  गवतातच) घ्यायची आणि समोरच्याला जाऊ द्यायचं. आपल्याला असं कुणी जाऊ दिलं तर त्यांना "Thank you" दर्शक हात केल्याशिवाय पुढे जायचं नाही असे सगळे अलिखित शिष्टाचाराचे नियम आजूबाजूला पोलीस नसतानाही सगळेजण पाळत होते. ह्याला अपवाद फक्त मेंढ्यांचा! काही ठिकाणी मेंढ्या रस्त्यात ज्या येत होत्या त्या गाडी जवळ येईपर्यंत जागच्या हलता हलत नव्हत्या ... आणि त्यांच्या मालकांचा दूरपर्यंत कुठेही मागमूस नव्हता. लेक डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही एका farm house वर मुक्काम केला होता. त्यांच्याही अशाच मेंढ्या दिवसरात्र बाहेर चरत होत्या. तिथल्या मालकिणीशी बोलताना तिनं सांगितलं होतं की कोणताही ऋतू असू दे, त्यांच्या मेंढ्या ते बाहेर मोकळ्यावरच राहू देतात.  तशाच इथल्याही मेंढ्या असणार. अर्थात एवढा मुबलक प्रमाणात खाऊ मिळत असेल तर त्यांना तरी आणखी काय हवं!


दुर्दैवानं जाण्यापूर्वी यॉर्कशायर डेल्सबद्दल आम्ही खूप माहिती काढली नव्हती, नाहीतर मला खात्री आहे आम्ही तिथं कमीत कमी एक रात्र तरी मुक्काम केल्याशिवाय पुढं गेलो नसतो. यॉर्कशायरच्या या भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात जंगल होतं. पण मध्ययुगीन काळात माणसानं इथली जंगलं तोडून शेती सुरू केली. त्या काळच्या ख्रिश्चनांनी भल्या मोठ्या abbeys बांधल्या. त्यानंतर या भागात वास्तव्याला आलेल्या बऱ्याच वेगवेगळ्या जमातींनी या भागावर आपला ठसा उमटवलाय... सध्या दिसतात ती दगडी कुंपणं आणि कुरणं हेसुद्धा तसं वाटत नसलं तरी बरंचसं मानवनिर्मितच आहे. साहजिकच आता दुग्धव्यवसाय आणि शेती हे इथल्या लोकांचं उपजीविकेचं मुख्य साधन आहे. वेन्सलीडेल क्रीमरी हा असाच एक व्यवसाय. डेल्स मधले अनेक शेतकरी या क्रीमरीला दुधाचा पुरवठा करतात.

याशिवाय इथं गुहा, labyrinths, अनेक धबधबे, मध्ययुगीन काळातल्या abbeys चे जतन केलेले अवशेष असं बरंचसं काही पाहायला आहे... बहुतेक सगळीकडे पायी जाता येतंच. मघाशी म्हणाले नं, आम्ही पुरेसं वाचून गेलो असतो तर नक्की इथं १-२ दिवस घालवले असते! असो. जो रस्ता साडेतीन तासात संपेल असं वाटलं होतं त्याला आम्ही जवळजवळ ८-१० तास घेतले. त्या दिवशी तन्मयीचा पण patience आमच्यामुळे test झाला! बिचारी भयंकर थकली होती संध्याकाळी मुक्कामी पोहोचेपर्यंत.

ज्यांना इंग्लंडला जायचं असेल त्यांच्यासाठी एक छोटी tip - यॉर्कशायर डेल्सला नक्की जा! तिथं मुक्काम करून walking-hiking वगैरे करायला वेळ नसेल तर केवळ तिथून drive तरी करत जा... आतल्या छोट्या-छोट्या रस्त्यांनी. लहान मुलांना घेऊन जायचं असलं तरी काही पंचाईत नाही. कितीही छोटं गाव असू देत, एक तरी public toilet तिथे असतंच. काही ठिकाणी तर फक्त लहान मुलांचे डायपर बदलण्यासाठी खास खोल्या बांधलेल्या आहेत. जाणार असाल तर वेन्सलीडेल क्रीमरीला नक्की भेट द्या. तिथलं अप्रतिम चीज खायची संधी तर अजिबात सोडू नका! It is all totally worth it!

अजूनही पटत नसेल तर तिथले आणखीन फोटो आहेतच माझ्याकडे... A picture is worth a thousand words! So as they say in the UK, "Cheers!"










Comments

  1. Superb.... England seems to have its own charm!!!!

    Dipti

    ReplyDelete
    Replies
    1. Definitely. I went with no preconceived notions and was pleasantly surprised in many ways.

      Delete

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *