Mom Says, Dad Says
कधी कधी काही घटना आपल्याला स्वतःबद्दलच खूप काही शिकवून जातात. मागे एका पोस्टमध्ये मी लिहिलं होतं की तन्मयीच्या developmental delays आणि एपिलेप्सीच्या निदानानं मला खूप काही शिकवलं. गेल्या वर्षी तिच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी आम्ही जेव्हा सुरु केल्या, तेव्हा माझ्या स्वतःबद्दलच्या संकल्पनांना धक्का देणारा मला तसा पहिला अनुभव आला.
इथल्या "Early Intervention" system मध्ये आम्ही तन्मयीला घातलंय. त्यानुसार मूल ३ वर्षांचं होईपर्यंत फिजिओथेरपिस्ट, developmental थेरपिस्ट वगैरे सगळे घरी येऊन सेशन्स घेतात. त्यांच्याशी आपली गाठ घालून द्यायला आणि आपलं "account" manage करायला एक coordinator दिलेली असते. मूल ३ वर्षांचं झालं की त्या system मधून बाहेर पडून आपले आपल्याला थेरपिस्ट गाठावे लागतात. तर साधारण एक वर्षभरापूर्वी Early Intervention च्या coordinator आणि थेरपिस्टसोबत आमची पहिली meeting झाली. तेव्हा तिथं असलेल्या सगळ्याजणी मला "mom" आणि रोहितला "dad" म्हणून संबोधत होत्या. म्हणजे काहीही सांगताना किंवा लिहिताना "Mom and dad's first goal for Tanmayee is..." किंवा "Mom has noted that Tanmayee does not..." वगैरे वगैरे. त्या तसं बोलत असताना माझ्या मनात एकच विचार घुमत होता, "Stop calling me that! I am Madhura. Not just 'mom!'" आणि मग माझा मलाच धक्का बसला... वाटलं, की आपण असा विचार कसा काय करू शकतो!शंका आली की मी स्वतःला "तन्मयीची आई" या भूमिकेत स्वीकारलंय की नाही?! मनात असा विचार आल्यानं खूप अपराधीही वाटलं. त्यानंतर वेगवेगळ्या वेळी तन्मयीला डॉक्टरकडे किंवा हॉस्पिटलला नेल्यावर, थेरपिस्टसोबतच्या नंतरच्या मीटिंग्समध्ये हा अनुभव वारंवार येत राहिला. आणि दरवेळी मला स्वतःबद्दल तोच प्रश्न पडत राहिला.
यादरम्यान असं झालं की ऑगस्टपासून आम्हाला माझी आई किंवा सासूबाई यांची मदत नसणार होती. त्यामुळं मी ३ महिने कामावरून पूर्ण सुट्टी घेऊन तन्मयीपाशी राहायचं ठरवलं. मी प्रचंड excited होते! याच सुट्टीदरम्यान आम्ही इंग्लंडला जाऊन आलो. आल्यावर माझी गाण्याची परीक्षा वगैरे होती, शिवाय तन्मयीची थेरपी, डॉक्टर visits, तिच्या इतर activities हे सगळं manage करणं ही होतंच. त्यामुळं मी घरी असून खूप busy होते. शिवाय माझ्या सुट्टीच्या शेवटच्या १.५ महिन्यात तन्मयीच्या तब्येतीचे बरेच चढ-उतार manage करावे लागले. या सगळ्या प्रकारात माझं सतत डोकं खाणारा तो प्रश्न मागे पडला.
पण गेल्या सोमवारी ऑफिस परत join केलं आणि डोक्यात लख्ख प्रकाश पडला, की आपण स्वतःला किती चुकीचा प्रश्न विचारत होतो. अर्थातच तन्मयीची आई म्हणून मी स्वतःला केव्हाच स्वीकारलंय. पण आजूबाजूचे माझ्याकडे त्या दृष्टीकोनातून बघतात याचा माझ्यावर कधी नव्हे इतका परिणाम मी होऊ देत होते. कारण माझ्यासाठी तन्मयीची आई ही ओळख जितकी महत्त्वाची आहे, तितकीच महत्त्वाची माझी त्यापूर्वीची ओळखही आहे. मी घराबाहेर, आॅफिसमधे किंवा इतर ठिकाणी, कायम एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून वावरत आलेय्. पण थेरपिस्टसाठी किंवा तन्मयीच्या डॉक्टरांच्या लेखी हे सगळं नगण्य आहे; किंबहुना ते तसंच असावंही. कारण त्यांच्यासाठी तन्मयी महत्त्वाची आहे, मला काय वाटतं किंवा माझी ओळख काय हे महत्त्वाचं नाही.
Unfortunately माझी प्रश्नावली इथं थांबली नाही. आता पुढचे प्रश्न पडायला लागले... की थेरपिस्ट, डॉक्टर्स जे वागतात ते सगळं reasonable आहे हे मला समजतंय, तर मग या सगळ्याचा इतका त्रास कशासाठी मी करून घेत होते? यापूर्वी माझी ओळख कधी बदलली नाही असं तर झालं नव्हतं. म्हणजे लग्न झाल्यावर मी पत्कींची सून झाले, रोहितची बायको झाले, तेव्हा नवीन भेटलेल्या व्यक्तींना माझी तशी ओळख करून देताना माझी आधीची ओळख मागे पडतेय अशी भीती मला कधीच वाटली नाही. मग ह्याचवेळी असं का?
माझी एक खोड आहे... एकदा का असे कोणतेही प्रश्न पडले की त्यांच्या मुळाशी गेल्याशिवाय मला शांतता लाभत नाही. त्यामुळं मी सतत खूप introspection करत स्वतःचं डोकं खात बसलेली असते. रोहित, माझी आई आणि माझा भाऊ मला थांबवण्याचं "अमूल्य" आणि कंटाळवाणं काम सतत करत असतात. पण माझ्या या शंका त्यांच्याशी share करायचं माझं धाडस झालं नव्हतं.
मंगळवारी दुपारी तन्मयीला सोबत घेऊन गाण्याचा रियाझ करताना अचानक डोक्यात ट्यूब पेटली आणि मन शांत झालं. याआधीचे सगळे significant बदल, ज्याला आपण "life event" म्हणू शकू - म्हणजे कॉलेज graduation, लग्न आणि even तन्मयीचं आमच्या आयुष्यात येणं हे अत्यंत आनंदाचे आणि स्वेच्छेनं घेतलेले निर्णय होते. त्यामुळं तेव्हा माझी जी ओळख बदलली होती ती स्वीकारणं कधीच जड वाटलं नाही. पण तन्मयीचं आजारपण, तिचे delays हा काही आम्ही स्वेच्छेने घेतलेला निर्णय नाही, आनंदाचा प्रसंग तर त्याहून नाही आणि मागून घेतलेली परिस्थिती तर नाहीच नाही. So त्या संदर्भात जेव्हा जेव्हा माझी "तन्मयीची आई" याव्यतिरिक्त असलेली ओळख मागे पडायला लागली तेव्हा तेव्हा माझ्या स्वतःबद्दलच्या संकल्पनेला धक्का पोहोचत गेला. आणि त्यामुळे जी चिडचिड होत होती त्याविषयी प्रचंड अपराधीपणा मनात दाटून येत राहिला. कित्येकदा जवळच्या लोकांशी बोलतानासुद्धा resentful वाटायला लागलं. जो-तो तन्मयी कशी आहे विचारणार, आम्ही दोघे कसे परिस्थिती स्वीकारतोय हे फार कमीजण विचारतायत हे सतत जाणवत राहायचं. खरं तर जो आजारी आहे त्याच्याविषयी naturally भरपूर चौकशी, आणि त्याची काळजी घेणाऱ्यांच्या मानसिक अवस्थेविषयी अनवधानाने दाखवली जाणारी अनास्था हे आपल्याकडे खूप common आहे. पण या असामान्य परिस्थितीत मला हे सगळं न जाणवतं तरच आश्चर्य होतं.
आमच्या पहिल्याच मुलीच्या बाबतीत असे सगळे complications असल्यामुळं सामान्य परिस्थितीत आयांच्या मनात असा identity crisis निर्माण होतो का, त्याचा त्यांना त्रास होतो का याची मला कल्पना नाही. कारण त्याविषयी कधीच कुणी काहीच बोलत नाही. त्याविषयी बोलणं म्हणजे जणू काही "आई" या भूमिकेशी प्रतारणा केल्यासारखं समजलं जातं की काय कोण जाणे. आपण वाचतो त्या साहित्यातून, आजूबाजूच्या परिस्थितीतून, आणि स्वतःच्या आणि मित्र-मैत्रिणींच्या आयांकडे पाहात मोठे होत असताना "स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते" हा message आपल्यापर्यंत किती strongly पोहोचत असतो! स्त्री ही पत्नी किंवा माता होण्याआधीही इतर बरंच काही असते हे जणू विसरायलाच होतं. आणि या सगळया संकल्पनांचा कळत-नकळत आपल्या मनावर किती खोल परिणाम होत असतो याची जाणीव मला या कठीण प्रसंगातच झाली.
तन्मयीच्या अनुषंगाने माझ्या मनात स्वतःबद्दल जेव्हा जेव्हा शंका उभ्या राहतात, तेव्हा प्रत्येकवेळी रोहितसारखा जोडीदार माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहे याची मला जाणीव होते आणि बरं वाटतं. आमच्यात अशा चर्चा खूप मोकळेपणानं, आणि एकमेकांविषयी कोणतेही पूर्वग्रह न ठेवता, without any judgement होतात याचा मला अभिमान आहे. मला वाटतं की त्याचमुळे याहीवेळी मी अपराधीपणाच्या भावनेच्या पलीकडे जाऊन स्वतःविषयी इतका नीट विचार करू शकले.
सध्या जरी सगळं सोपं वाटत असलं तरी इथून पुढच्या तन्मयीसोबतच्या प्रवासात अजून वेगवेगळे खूप अडथळे असणारच आहेत. वेगवेगळ्या वेळी माझ्या स्वतःबद्दलच्या अनेक संकल्पनांना धक्का पोहोचणारच आहे. पण त्यात स्वतःला न गमावता गोष्टी कश्या साधायच्या याविषयीचा हा पहिला धडा होता असंच मी म्हणेन.
Comments
Post a Comment