(Un)conditional Love
सुरुवाती-सुरुवातीला "आमची मनी कित्ती छान नाचते" किंवा "आमचा छोट्या २ वर्षांचा असल्यापासून तबला शिकण्यात रस दाखवतो" वगैरे वाक्यांमधून सहसा हे प्रेम दिसतं. समोरच्याला ते कौतुक ऐकायची कितीही इच्छा नसली तरी ह्याप्रकारचं bragging करणे हा आई-वडिलांचा हक्कच असतो जणू! पुढे केव्हातरी मुलं शाळेत जायला लागली की मग मुलांच्या activities वाढतात. गाणं-नाच-स्विमिंग अशा कोणत्यातरी क्लासला त्यांना घातलं जातं. माझं लहानपणही याच साच्यातलं होतं की! शाळेत असताना on a given day माझ्या किती वेगवेगळ्या activities चालू असायच्या हे पाहिलं तर माझ्या आईपेक्षा मीच जास्त busy होते असं म्हणावं लागेल. आईचं ऑफिस-एके-ऑफिस, तर माझ्यामागे गाणं, भरतनाट्यम, शाळा, अभ्यास आणि शाळेतल्या १०० extracurricular activities असायच्या! असो. मुलांना हे सगळं करता यावं यासाठी आई-वडील खरोखरच जिवाचं रान करत असतात. आणि मुलंही मग या सगळ्यात गुंतत जातात. काहींना या सगळ्या उठाठेवींमधून स्वतःचा असा वेगळा मार्ग सापडतो, तर काहीजण आपला कल कुणीकडे आहे हा विचार न करता सरळ धोपटमार्गावरून चालू लागतात.
एखाद्याचं यशापयश मोजण्याचे आपल्या समाजात काही ठोकताळे ठरलेले आहेत. म्हणजे आमच्या मुलाला/मुलीला दहावीत चांगले मार्क पडले, IIT ला admission मिळाली, डॉक्टर झाला/झाली, आमची सून आमची काळजी घेते, जावई कंपनीत मोठ्या पदावर आहे, आम्ही वर्षातून एकदा परदेशी फिरायला जातो, इत्यादी इत्यादी. आपण आणि आपली मुलं या चौकटीत बसलो तर सगळे चांगले, नाहीतर "एवढी हुशार आहे पण अभ्यास करायला नको" किंवा "एवढं वैभव आहे पण मुलगा लांब" असा असमाधानाचा सूर अगदी पटकन आपल्या तोंडून निघतो. अनेकदा नात्यांमध्ये तणाव शिरतो, अगदी जवळची माणसं एकमेकांना दुरावतातसुद्धा. या आणि अशाच फूटपट्ट्यांवर माझं स्वतःचंही एक मुलगी म्हणून, बहीण म्हणून, सून म्हणून, बायको म्हणून, करियर वूमन म्हणून यश-अपयश मोजलं गेलंय आणि इथून पुढेही जाईल याची मला पूर्ण जाणीव आहे.
सहसा आपण बोलतो-ऐकतो की आई-वडिलांचं मुलांवरचं प्रेम निरपेक्ष असतं. किंवा आईसारखं प्रेम कुणीच करू शकत नाही. प्रेमस्वरूप वात्सल्यसिंधू आई वगैरे वगैरे. पण मग मुलं मोठी होत जातात तसा त्या नात्यात conditions आणि अपेक्षांचा शिरकाव नेमका केव्हा होतो? यशापयशाची गणितं नात्यापेक्षा मोठी का होतात? कुणाला माहीत आहेत याची उत्तरं?
रोज तन्मयीला बघते, तिची आई म्हणून वावरते तेव्हा या सगळ्या system मधला फोलपणा ढळढळीत सूर्यासारखा माझे डोळे दिपवत राहतो. जाणवतं, की तन्मयी आणि तिच्यासारख्या developmentally challenged मुलांना या सगळ्यात कुठं जागाच नाहीये. There is a good chance की माझी मुलगी कधीच माझ्यासारखे ८०-९०% मिळवून दहावी पास होणार नाही. मी शिकले त्या Finance मधला F तरी तिला कधी समजेल का मला माहीत नाही. मोठी होऊन, स्वावलंबी होऊन तिनं आमची काळजी घेणं सोडाच, कदाचित आम्हालाच तिची काळजी घेत राहावी लागू शकते. आमच्या माघारी ती नीट राहील याची सोय करावी लागू शकते. असा एकही दिवस जात नाही जेव्हा मला या गोष्टींची जाणीव होत नाही. मग अशा मुलीला यशापयशाची मला लावली गेलेली मोजमापं मी कशी लावू? ती एक मुलगी म्हणून किती यशस्वी होतेय हे कसं ठरवू? किंवा तिनं असं यशस्वी होणं खरंच किती महत्त्वाचं आहे? की या सगळ्या फूटपट्ट्या तिला लागू होत नाहीत म्हणून ती काही न करताच अपयशी आहे असं म्हणायचं? आणि तसं नसेल तर मग मुळात या पठडीतल्या मोजमापांना इतकं कवटाळून तरी का बसायचं? ती अशी आहे म्हणून तिच्यावर माझं बिनशर्त प्रेम आहे. पण मूल कसंही असो, त्यानं आपल्या अपेक्षा पूर्ण करो अथवा न करो, सगळं काही चांगलं आणि normal असताना का आपल्याला त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करता येऊ नये?
या घडीला तरी माझ्याकडे प्रश्न जास्त आणि उत्तरं कमी आहेत. कुणाला ती सापडली, उमजली, तर मला नक्की येऊन सांगा. Meanwhile, माझ्याकडे निरपेक्ष प्रेम करण्यावाचून पर्याय नाही. पण तुमच्याकडे तो असेल तर choose unconditional love. कारण मुलांच्या दृष्टीने त्यापेक्षा मौल्यवान दुसरं काही नसतं अशी आता माझी खात्री पटतेय.
So beautifully written..more strength bo you...
ReplyDeleteWell said
ReplyDelete