डोळे कशासाठी?

समजा तुम्ही एखाद्या धबधब्याजवळ उभे आहात. समोर दिसणारा पाण्याचा कडेलोट, अंगावर उडणारे पाण्याचे तुषार, ऐकू येणार पाण्याचा आवाज, पाणी-माती-शेवाळं या सर्वांचा मिळून तयार झालेला तो विशिष्ट वास आणि क्वचितच तोंडात पाणी गेलं तर त्याची लागणारी चव हे सर्व काही मिळून आलं की त्या धबधब्याचा आपल्या मनात एक अनुभव तयार होतो. डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा या पंचेंद्रियांनी आपण अशाप्रकारे रोज आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टींचा अनुभव घेतो, मनात साठवतो आणि आठवणींच्या कप्प्यात टाकतो. वेळ पडेल तसा आपल्याला हवा तो अनुभव हवा त्या वेळी बाहेर काढून त्याचा वापरही करता येतो. एक साधी गोष्ट आहे - लहान मुलं ज्या उत्सुकतेनं गोष्टी पाहतात, ऐकतात, हाताळायला बघतात त्याचं जरी कधी निरीक्षण केलं तरी लक्षात येईल की आपण आपल्या या पंचेंद्रियांवर किती विसंबून असतो. आता एखादेवेळी यातलं एखादं इंद्रिय काम देत नसेल तर? वर म्हणाले तो धबधबा तुम्हाला दिसतोय, feel होतोय पण त्याचा आवाज ऐकू येत नाही अशी कल्पना करा... अशा वेळी आपला अनुभवच अपूर्ण राहतो. 

कोणत्याही वस्तूची, जागेची किंवा व्यक्तीची पुरती ओळख होण्यासाठी डोळ्यांसारखं दुसरं महत्त्वाचं इंद्रिय नाही. मला वाटतं आपण डोळ्यांवर जितके विसंबून असतो तितके इतर कोणत्याच अवयवावर अवलंबून नसतो. वस्तूचा रंग, रूपरेषा, आकार, पोत आणि इतर बऱ्याच गोष्टी आपल्याला डोळ्यांमुळे समजतात, जास्त पक्केपणाने लक्षात राहतात. जगभरातली बहुतेक सर्व शिक्षणपद्धती ही दृष्य गोष्टींवर अवलंबून आहे - मग ती एखादी कविता शिकणं असो, भूगोलातले नकाशे असोत, भूमितीतले आलेख (graphs) असोत किंवा biology मधला प्राणीपक्ष्यांच्या शरीराचा अभ्यास करणं असो. नोकरीतही तेच. कोणतंही presentation किती visually appealing आहे त्यावर पुढच्या गोष्टी ठरतात. Websites चा user interface, त्याचं design, यात संपूर्ण career घडवता येऊ शकतं. आपलं... नव्हे, माझंही... सर्व जग मुख्यतः ज्यांचे डोळे काम देतात अशा माणसांसाठी बनलेलं आहे. मी स्वतः तशीच लहानाची मोठी झालेय. आपल्यापैकी बहुतेक सर्वजण या ना त्या प्रकारे visual thinking करत असतो. नीट लक्ष दिलंत तर आढळेल. उदाहरणार्थ, एखाद्या पुस्तकातला उतारा किंवा कविता तोंडपाठ म्हणून दाखवताना आपल्याला डोळ्यांसमोर पुस्तकातलं पान जसंच्या तसं उभं असतं. म्हणजेच अक्षरं अथवा आकृत्यांमागच्या प्रत्यक्ष शाब्दिक अर्थाबरोबरच त्यांचे visual patterns कसे आहेत याला आपल्या विचारप्रक्रियेत अनन्यसाधारण महत्त्व असतं. 

मी हे सर्व का लिहितेय? गेले बरेच महिने माझा स्वतःशीच मोठा संघर्ष चालू होता. तन्मयी visually impaired (आंधळी नव्हे - कशी ते मी पुढे सांगेनच) आहे याचा आम्हाला खूप पूर्वीच अंदाज आला होता. पण तसं असणं म्हणजे नक्की काय आणि त्याचे परिणाम काय हे आतून मनातून समजून घेता येत नव्हतं. कसं येईल? मला अनुभव थोडीच आहे! पण त्यामुळे तिची आई असूनही तिच्या जागी स्वतःला ठेवून विचार करणं माझ्या आवाक्याबाहेरचं होतं, आणि ते मला सहन होत नव्हतं. त्यामुळे मी शेवटी एक parent support group join केला. तन्मयीच्या Vision therapies मुळे "CVI" म्हणजे "Cortical / Cerebral Visual Impairment" ही एक concept समजली होती. त्यामुळे ही visual condition ज्यांच्या मुलांना आहेअशा पालकांसाठीचा support group प्रचंड शोधाअंती मिळाला तसा मी तो लग्गेच join केला. CVI असलेल्या वेगवेगळ्या वयाच्या मुलांचे पालक - मुख्यतः आया - या support group मध्ये आहेत. त्यांचे अनेक अनुभव ऐकून हळूहळू मीही या condition विषयी माहिती मिळवतेय आणि तन्मयीचं पुढचं शिक्षण तिला तिच्यासाठी योग्य अशा मार्गानं नीट घेता यावं याची सोय कशी लावता येईल हे पाहतेय.

मी वर जी उदाहरणं दिलीत त्यावरून हे सहज लक्षात यावं की कोणत्याही प्रकारची visual impairment त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या कितीतरी छोट्याछोट्या भागांना स्पर्श करते. अशावेळी त्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी त्यांची visual impairment काय प्रकारची आहे हेसुद्धा समजून घेणं अनिवार्य ठरतं. तन्मयीसकट आमच्या आयुष्याचा हा खूप मोठा भाग असल्यामुळे त्याविषयी मी लिहिणं, बोलणं आणि एकंदरीतच जागरूकता निर्माण करणं हे ओघाओघानं आलंच!

तर CVI म्हणजे काय?

साधारणपणे visual impairments दोन प्रकारच्या आहेत असं मानलं जातं. पहिला प्रकार म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष डोळ्यांमध्ये काही कमतरता असते. हा प्रकार आपल्याला सहसा माहित नाही असं होत नाही. एखादा आंधळा आहे, किंवा एखाद्याला कमी दिसतं म्हटलं की आपण याच प्रकारच्या visual impairment चा विचार करतो. चष्मा असणे हे या प्रकारातच मोडतं. याकरता आपण सहसा डोळ्यांच्या डॉक्टरकडे जातो. 

दुसरा प्रकार म्हणजे neurological किंवा cerebral (सेरेब्रल) visual impairment. या प्रकारात एपिलेप्सीसारख्या मेंदूशी संबंधित आजारांमुळे किंवा stroke सारख्या मेंदूला इजा पोहोचवणाऱ्या घटनेमुळे दृष्टीवर परिणाम होतो. डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवलं की ते सांगतात डोळे एकदम ठणठणीत आहेत, पण त्या व्यक्तीला तर दिसत नसतं... किंवा कमी दिसत असतं. 

सामान्यतः आपले डोळे समोरच्या वस्तूचं एक चित्र रेखाटतात. हे चित्र मग आपल्या मेंदूत परावर्तित होऊन मेंदू त्याचा अर्थ लावतो. Cerebral visual impairment असणाऱ्या व्यक्तीत ही मेंदूची प्रक्रिया विस्कळीत झालेली असते आणि त्यामुळे त्या व्यक्तीला दिसत नाही, किंवा कमी दिसतं, किंवा समोरच्या गोष्टीतला ठराविकच भाग दिसतो. उदाहरणार्थ, समोर लाल चोचीचा हिरवा पक्षी असेल तर एखाद्याला कदाचित फक्त लाल चोच दिसेल, किंवा फक्त पक्ष्याचा काळा डोळा दिसेल. किंवा असंही होऊ शकतं की पक्ष्याचा साधारण आकार दिसेल पण डोळा कोणता, चोच कोणती, पंख कोणते असे details समजणार नाहीत. 

यात अजून complication असं असतं की मेंदूचा कोणता भाग affected आहे यावर दृष्टी किती आणि कोणत्या बाबतीत अकार्यक्षम आहे हे अवलंबून असतं. उदाहरणार्थ, एखाद्याच्या मेंदूच्या उजव्या भागात stroke झाला असेल तर त्याचा फक्त डावा डोळा कमजोर होईल. मग तो पक्षी उजव्या बाजूला आला तरच त्या व्यक्तीला दिसेल...डावीकडे असल्यास दिसणारच नाही. शिवाय त्यातही उजव्या मेंदूचा कोणता भाग जास्त injure झालाय त्यावर ठरेल की त्याला पक्षी समोर असताना दिसेल, डोळ्याच्या कोपऱ्यातून दिसेल, डोळे वर नेले असता दिसेल की ते खाली केल्यास दिसेल! 

सहसा एपिलेप्सीसारख्या chronic आजारांमुळे जेव्हा visual impairment होते तेव्हा ती मेंदूच्या नेमक्या कोणत्या भागातल्या कमजोरीमुळे निर्माण झालेली आहे हे कटाक्षानं पाहावं लागतं. आणि मुख्य माहित असावी अशी गोष्ट म्हणजे या प्रकारची visual impairment योग्य therapy आणि ती व्यक्ती जिथं राहते तो परिसर (म्हणजे अगदी घरातली खोली, bathroom ते अंगण इथपर्यंत काहीही) योग्य त्या प्रकारे adapt करून ती visual impairment बऱ्याच प्रमाणात कमी करता येते!!! You can teach them  to see! यासाठी मूल जितकं लहान तितका होणारा फायदा जास्त असं आतापर्यंतचा scientific research सांगतो. 

CVI विषयी खूप म्हणजे खूपच कमी माहिती उपलब्ध आहे. जगभरात अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच संस्था या field मध्ये काम करतात. प्रत्येक क्षेत्रात असतात तशी त्यातही मत-मतांतरे आहेतच. मी जसजसं अजून यातलं शिकत जाईन तसं इथं लिहीणारच आहे. आज इथेच थांबते कारण हेच खूप आहे. 


स्क्रीनवर हलणारी रंगीत चित्रं CVI असणाऱ्या व्यक्तीसाठी visually interesting असू शकतात 

एखाद्या चकचकीत वस्तूवर focused प्रकाशझोत टाकून बाकी background काळी ठेवून ती वस्तू हळूहळू बघायला CVI असणाऱ्यांचा मेंदू प्रवृत्त होऊ शकतो 

वरीलप्रमाणेच चमकणारी वस्तू, पण इथे सूर्यप्रकाश आहे

Gel ने भरलेली पिशवी, त्यात काही रबरी प्राणी सोडलेत आणि खालून प्रकाशझोत आहे ज्यामुळे ती पिशवी glow होतेय 
















Comments

Contact Me

Name

Email *

Message *