अकस्मात

 

रहाटगाडगं चालू आहे
कुणी कुठे, तर कुणी कुठे
जात आहे, येत आहे
ठरलेल्या वाटेनं, रेखीव हमरस्त्यानं

कुणी नित्यविधि पार पाडत आहे
न चुकता, न माकता,
घेतला वसा न टाकता
अगदी सहज, सवयीनं

काळ पुढे जातो आहे
तो पाहा!
अरे! का त्याचाही वेग मंदावतो आहे? 
माझीही पावलं आता पडताहेत त्याच्या जोडीनं

मनात नसता होत आहे
त्याच्याशी हितगूज
सांगते आहे त्याला, "बाबा रे, तू आलास,
पण वेळ आली नाही! नंतर ये तिच्याच सोबतीनं..."

तो आल्यापावली गेलाय् निघून 
माझं झटक्यात ऐकून
पण मी...? मी थांबलेय् न्याहाळत
अविरत चालणारं रहाटगाडगं

- मधुरा 

Comments

Contact Me

Name

Email *

Message *