Humanism vs Patriotism: A Balancing Act

"Neither the colourless vagueness of cosmopolitanism, nor the fierce self-idolatry of nation-worship, is the goal of human history." - Rabindranath Tagore
___________________________________________

मी साधारण ६ वर्षांपूर्वी अमेरिकन नागरिकत्व पत्करलं. अगोदर एक फॉर्म भरुन देणं, मग बायोमेट्रिक, त्यानंतर इंटरव्ह्यू आणि मग सरतेशेवटी प्रतिज्ञा घेणं अशी त्याची लांबलचक प्रक्रिया होती. जवळपास वर्ष गेलं ह्या सगळ्यात. हे करण्याआधीच मी खरं तर मुंबईला शिफ्ट झाले होते.

अतिशय नाखुषीनं १२वीनंतर अमेरिकेत आल्यावर इथे रुळायला मला मुळात वेळ लागला होता. ज्ञान प्रबोधिनी आणि स.प.महाविद्यालयातलं शिक्षण माझं! त्यापलीकडे इतर काहीही न पाहिलेल्या मला दुसऱ्या देशात स्थलांतर करणं म्हणजे नेमकं काय हे वयाच्या १८ व्या वर्षी समजणं तसं शक्यच नव्हतं. तेव्हा एवढंच समजत होतं की माझ्या सगळ्या मैत्रिणी, इतर नातेवाईक इथं आहेत, मग मी पुणे सोडून का जाऊ? शिकागोला शिफ्ट झाल्यावर घराऐवजी कॉलेजच्या हॉस्टेलला राहायचं म्हणजे तेव्हा दिव्यच वाटत होतं. वर्षातले ८ महिने थंडी; इंग्रजी लिहिता-वाचता उत्तम येत असलं तरी रोजच्या व्यवहारात त्याचा वापर करण्याच्या नावाने बोंब; संपूर्ण शाकाहारी असल्यानं कँटीनमध्ये मिळेल ते मॅश्ड पोटॅटो, पॅनकेक्स, बेक्ड पोटॅटो, कधीतरी अर्धवट शिजलेला भात असं थर्ड ग्रेडचं (read: unhealthy) रोजचं खाणं; अमेरिकन संस्कृतीबद्दल ओ की ठो माहिती नसल्यानं रूममेटशी, प्रोफेसर्सशी धड संवादही साधता येत नव्हता. सगळी गडबड! आई फोनवर सतत available असायची, पण शेवटी ती फोनवर. प्रत्यक्ष समोर येणाऱ्या अडचणी सोडवायला लागणारे आवश्यक skills मलाच develop करायचे होते. मुळात मी खूप reserved असल्यामुळे मला ते अजूनच जड जायचं. हळूहळू इथं adjust व्हायला लागल्यावर हे सुरुवातीचे प्रॉब्लेम्स कमी झाले. माझ्या शाळेतल्या मैत्रिणींनीपण माझ्यासाठी ई-मेल वगैरे शिकून ते करायला सुरुवात केली त्यामुळे सगळं अजून सोप्पं झालं. कॉलेजच्या ३ऱ्या वर्षी इंटर्नशिप करायला लागल्यावर खूप गोष्टी आपल्याशाही वाटायला लागल्या. पण आपल्याला इथं कायमचं राहणं जमणार नाही असं सतत कुठेतरी जाणवत राहायचं.

कॉलेज संपवून २-३ वर्षं नोकरी करून मग ठरवलं की भारतात परत जायचं. आईचा अर्थात सपोर्ट होताच. तिनं फक्त एकच अट ठेवली की नोकरी लागल्याशिवाय भारतात परत जायचं नाही. अर्थात नोकरी लागली ती मुंबईत, आणि आपल्या इथलं work culture वेगळं... त्यामुळं येणाऱ्या अडचणी वेगळ्या... हे सगळं लक्षात ठेवून मी शिफ्ट झाले.

पुष्कळदा असं होतं की अमेरिकेत, किंवा एकंदरीतच परदेशी राहून जे परत भारतात येतात, ते एक प्रकारचा nostalgia मनात ठेवून येतात. आणि आपला developing देश असल्यामुळे आपल्या इथलं एकंदरीतच राहणीमान, हवामान आणि trends इतके पटापट बदलत असतात की येणारे reverse culture shock ला बळी पडतात. त्यांना आठवत असतं तसं आजूबाजूला काहीच नसतं. आणि आजूबाजूच्या झपाटयाने बदलणाऱ्या परिस्थितीशी relate न करू शकल्यामुळे बरेचसे परतही जातात. माझ्या बाबतीत हे असं काही झालं नाही, पण एक वेगळाच पेच होता. अमेरिकेत माझं ग्रीनकार्ड काढलेलं होतं. आणि ६ महिन्यात अमेरिकेत गेले नसते तर ग्रीनकार्ड surrender करावं लागलं असतं. आई आणि अनिरुद्ध अमेरिकेतच राहणार असल्यामुळे मला तिथं जाण्या-येण्याची flexibility ठेवणं आवश्यक होतं. त्यामुळे अमेरिकन नागरिक होण्यावाचून दुसरा पर्याय दिसत नव्हता. मनात कुठेतरी guilt होता की आपण भारताचं नागरिकत्व सोडून देशाशी प्रतारणा करतोय वगैरे. आई, माझा नवरा, सगळे समजावत होते की एक मतदानाचा हक्क सोडला तर भारतातलं माझं रोजचं राहणीमान अमेरिकन नागरिकअसले तरी विशेष बदलणार नव्हतं. शेवटी आई-भाऊ जास्त महत्त्वाचे असल्यामुळे मी अमेरिकेची नागरिक झाले. (तरी नागरिकत्वाची प्रतिज्ञा घेताना काही काही शब्द उच्चारायला मन धजावत नव्हतं ते नव्हतंच.)

पण ह्या सगळ्या प्रकारात मला प्रश्नच जास्त पडत गेले. माझ्या मातृभूमीचं नागरिकत्व मी काही कारणास्तव सोडलं म्हणून माझी देशभक्ती कमी पडली का? थिएटरमध्ये जन गण मन लावणं मला पटत नाही म्हणजे मी भारतीय म्हणून कमी पडते का? इतर मार्गाने मी माझ्या मातृभूमीसाठी काही करू गेले तर केवळ मी त्या देशाची नागरिक नाही म्हणून ते फोल ठरतं का? मुळात देशभक्ती हे "मूल्य" आहे, सद्गुण आहे, असं कुणी ठरवलं? ते आपल्या देशाच्या झेंड्याचा ठराविक पद्धतीने मान राखून, ठराविक गाणी गाऊनच व्यक्त केलं जावं हे compulsion कशासाठी? जगभरात जाऊ तिथे बहुतेक ठिकाणी देशाभिमान आढळतो. अमेरिकेतही तो मोठा सद्गुण मानला जातो. मग पाकिस्तानी लोकांना पाकिस्तान महान वाटतो त्यात त्यांचं काय चुकलं? कुणीतरी arbitrary सीमारेषा आखायच्या आणि देश define करायचे... त्या सीमारेषेच्या एका बाजूला जन्माला आले ह्यात माझं काय मोठं कर्तव्य आहे की मी त्याचा विशेष अभिमान बाळगावा?

अमेरिकन नागरिक झाल्यावर साधारण तीनएक वर्षांनी मी पुन्हा अमेरिकेत राहायला आले तरी ह्या पडलेल्या प्रश्नांची उत्तरं अजून नीटशी मिळतायत असं वाटत नाही. पण मी जगभरात जिथं कुठं राहतेय तिथं आजूबाजूला राहणारे भारतीय असोत वा नसोत, माझ्यासारखे दिसोत अथवा ना दिसोत, माझी भाषा बोलोत किंवा ना बोलोत, त्यांच्याकडे प्रथम माणूस म्हणून बघणं मला आता सर्वात जास्त महत्वाचं वाटायला लागलंय एवढं नक्की!
___________________________________________

"I am willing to serve my country; but my worship I reserve for Right which is far greater than country. To worship my country as a god is to bring curse upon it- Rabindranath Tagore


Comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *