पाहावं असं काही : इंग्लंडमधले चर्च आणि ऍबी


इतिहास आणि चालू घडामोडी यातला फरक नेमका कसा समजून घ्यायचा, किंवा आपल्याला ऐतिहासिक वाटणाऱ्या पण ज्यांचा आपल्या आत्ताच्या समाजावर न पुसता येणारा परिणाम आहे अशा घटना कोणत्या, ते परिणाम कोणते, हे सर्व आपल्यापैकी कितीजण नेमकं सांगू शकू याची मला खात्री नाही. शाळेत आपण इतिहासात शिकतो त्याचाही आपल्यावर किती असर होतो हेही clear आहे! पण as an adult, आपण ऐतिहासिक वास्तू किंवा त्यांच्या अवशेषांना भेटी दिल्या की आपला आपल्यापुरता हे सगळं स्पष्ट होत जातं याचा अनुभव मी आमच्या इंग्लंडच्या ट्रिपमध्ये घेतला. अर्थात मायभूमी महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचा नुसता विचार जरी केला तरी माझ्या मनात हीच भावना मनात पाय घट्ट रोवून उभी राहते. मी शेवटचा पाहिला तो पन्हाळगड. त्यावेळी मी बरीच लहानही होते. त्यामुळे तेव्हा हे सगळं समजण्याची माझी कुवत नव्हती म्हणा, किंवा तशी जाणीव करून देणाऱ्या योग्य व्यक्ती सोबत नव्हत्या म्हणा, त्या ठिकाणांचं महत्व मला तितकं समजलंही नव्हतं. शिवाय आपणच आपला ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणांची साध्यासुध्या maintenance च्या बाबतीतही इतकी उपेक्षा करत असतो की तिथं लोकांनी यावं, त्या ठिकाणांचं महत्व समजून घ्यावं, सध्याच्या जगाशी असलेला त्यांचा relevance समजून घ्यावा याबद्दलचे प्रयत्न तर दूरच राहिले!

Westminster Abbey
खरं तर आपल्या गडकिल्यांचा इतिहास जितका जुना त्याहीपेक्षा जुना इंग्लंडमधल्या चर्च आणि ऍबीचा इतिहास आहे. पण इंग्लंडमध्ये, आणि संपूर्ण युरोपातच एकंदरीत, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या वास्तूंचं आणि वस्तूंचं जतन जितक्या काळजीपूर्वक केलं जातं त्याला तोड नाही. तिथले चर्चेस आणि ऍबी खूपच बघण्यासारखे आहेत. बऱ्याच ठिकाणी तर आता फक्त अवशेष उरलेले आहेत. पण कोणतीही जागा अगर वास्तू पाहायला येणाऱ्यांना तिकीट काढायला लावून त्यातून पैसे कमावणं, एक "ट्रस्ट" तयार करून त्यात ते जमा करणं, आणि ते गुंतवून त्यातून येणारं उत्पन्न त्या ठिकाणाच्या निगराणीसाठी वापरणं हे पाश्चिमात्य लोकांना फार छान जमतं. आम्ही जे ऍबीचे अवशेष पाहायला गेलो तिथंही हेच चित्र होतं. एवढंच काय तर वेस्टमिन्स्टर ऍबी किंवा यॉर्क मिन्स्टर यासारख्या वापरात असलेल्या वास्तूंसाठीसुद्धा exactly हीच system होती.

Stained Glass Windows
आपल्याकडची पुरातन मंदिरं जशी शिल्पकला किंवा अखंड दगडातलं कोरीव काम यासाठी प्रसिद्ध आहेत तशीच चर्चेस आणि ऍबी त्यांच्या stained glassच्या खिडक्यांसाठी! २५-२५ पुरुष उंचीवर असणाऱ्या छतावर वेगवेगळ्या पद्धतीचं नक्षीदार काम असतं किंवा चित्रं तरी काढलेली असतात. खालपासून ते पार त्या छतापर्यंत पोहोचणाऱ्या रंगीबेरंगी खिडक्या नजरेत मावेनाश्या होतात.

छतावरचं नक्षीकाम 
खूप वर्षांपूर्वी वेरूळचं कैलासमंदिर बघताना, त्याच्या आतली शिल्पकला अनुभवताना मी जशी आ वासून उभी होते, अगदी तशीच मी ह्या सगळ्या ऍबी आणि चर्च बघताना अवाक झाले. बायबलमधले अनेक प्रसंग, Jesus च्या आयुष्यातले प्रसंग आणि वेगवेगळ्या (कित्येक मला माहीतही नसलेल्या) ख्रिश्चन संतांच्या आयुष्यातले प्रसंग त्या खिडक्यांवर रंगवलेले दिसत होते.  अत्यंत primitive transportation systems वापरून या काचा बनवण्यासाठी लागणारी खास वाळू किंवा क्वचित तयार काचा मागवणं, त्यात रंग भरणं, त्या खिडक्यांमध्ये चढवणं ही सगळी process ५००-६०० वर्षांपूर्वीच्या लोकांनी कशी निभावली असेल या नुसत्या विचारानेच माझ्या अंगावर काटा उभा राहिला. जुन्यातला जुना stained glass आणि काहीसा नवीन stained glass असलेल्या खिडक्या यांच्या रंगातला बारीकसा फरकही समजून येईल अशी प्रकाशयोजना आतमध्ये केली होती. वाढत्या प्रदूषणापायी या खिडक्यांच्या काचेचं आणि रंगाचं खूप नुकसान होतंय. त्यामुळे सध्या त्या काचांच्या renovation चं काम एकेक करून केलं जातंय. जिथं असं काम चालू होतं ते भाग बंद होते. पण otherwise सगळीकडं मनसोक्त हवं तसं भटकायची सोय होती.

The Great West Window - York Minster
उंची: २३ मी., रुंदी: १० मी. 
यॉर्क मिन्स्टरमध्ये अत्यंत अवाढव्य अशी एक खिडकी आहे. जवळ जवळ २३ मीटर उंच आणि १० मीटर रुंदीच्या या खिडकीचा कॅमेऱ्यातून panorama च घ्यावा लागतो. एका shot मध्ये मावतच नाही ती! आम्ही तिथं stained glass guided tour पण केली. त्यात या सगळ्याबद्दल जास्त माहिती मिळाली. वेस्टमिन्स्टर ऍबीतसुद्धा अशी guided audio tour होती. तीही मस्त होती. या सगळ्या ऐतिहासिक वास्तू इंग्लंडच्या वर्तमानकाळाचासुद्धा अविभाज्य भाग आहेत. आपण त्या देशात राहात नसल्यामुळं त्यांच्या या guided tours केल्याशिवाय आपल्याला समजणारही नाही की का त्या जागा इतक्या महत्वाच्या आहेत!

Rievaulx Abbey
North York Moors
हे झालं सध्या वापरात असलेल्या वास्तूंचं. मी वर म्हणाले त्याप्रमाणे आम्ही काही ऍबीचे अवशेषही पाहायला गेलो होतो. म्हणजे खरं तर दोन ठिकाणी जाणार होतो, पण त्यातल्या पहिल्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्यांची वेळ संपली होती. त्यामुळे तो plan हुकला. पण दुसऱ्या ठिकाणी गेलो तिथे सगळी कसर भरून निघाली! Rievaulx Abbey हे ते ठिकाण. 

तिथला इतिहास जरा वेगळा आहे. ख्रिश्चन धर्माशी तसा फारसा संबंध नसल्यामुळं मला ते सगळं समजून घेणं किंचित जड गेलं. इथे नीट explain ही मी नाही करू शकणार. पण तो परिसर फिरायला फार म्हणजे फार मजा आली. एकतर पाऊस पडत होता, आणि उन्हाची साधी तिरीपही नव्हती. तिथल्या हिरव्यागार गवताच्या background वर ऍबीचे अवशेष एकदम उठून दिसत होते.

Rievaulx Abbey Nave
चर्चमध्ये लोक बसत असत तो मुख्य भाग
एका दरीमध्ये, उतारावर ही ऍबी आहे. त्या ऍबीमधले वेगवेगळे भाग कशाकशासाठी वापरले जात होते याविषयी माहिती देणाऱ्या छोट्या-छोट्या पाट्या ठिकठिकाणी लावल्या होत्या एवढीच काय ती तिथं माहिती मिळवण्याची सोय. Audio tour पण होती बहुतेक, पण आम्हाला तितका वेळ नसल्यानं त्याच्या मागे आम्ही लागलो नाही. शिवाय इथं wheelchair-friendly footpath ही नव्हते, त्यामुळं आळीपाळीने तन्मयीचा pram विचित्र प्रकारे चढत-उतरवत-ढकलत नेण्याची मोठी कसरत आम्हाला करावी लागत होती. पाऊस पडत असल्यामुळे तन्मयी पडद्यात (I mean covered!) होती आणि ते तिला फारसं आवडत नव्हतं. सगळीच धमाल. But I digress... Rievaulx Abbey चा नजारा पाहण्यासाठी साधारण मैलभर अंतरावर अजून एक जागा अनेक वर्षांपूर्वी बांधली गेली होती. वेळेअभावी तिथंही जायचं राहून गेलं.

असो. आमच्या सगळ्या इंग्लंडच्या ट्रीपमध्ये यॉर्क आणि आसपासचा परिसर मला सगळ्यात जास्त भावला. यॉर्क शहर तर मला आवडलंच, पण तिथलं एकंदरीत architecture, चर्च आणि ऍबी तर विशेष आवडले. इंग्लंडला जाणारे कितीजण अशा ठिकाणी जातात कुणास ठाऊक, पण ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी असे संपूर्ण इंग्लंडभर विखुरलेले कित्येक अवशेष easily accessible आहेत. अजून इतर युरोप मी फिरलेले नाही, त्यामुळं तिथं असं कितपत आहे याची मला कल्पना नाही. But I intend to find out soon.






________________________________________________________

ता. क. : इंग्लंडविषयी अजून लिहिण्यासारखं पुष्कळ काही निघू शकतं, पण कसं लिहावं हे डोक्यात तयार नाही. त्यामुळं सध्या इतकंच पुरे!








Comments

Contact Me

Name

Email *

Message *