Stress and the Art of Slowing Down

सध्या आपण सगळेच जसं जगतोय, त्यात मला हल्ली फक्त धावपळ दिसते. म्हणजे एका कामावरून दुसऱ्या कामावर आपण नुसत्या उड्या मारत असतो. शिवाय आपलं लक्ष वेधून घ्यायला टीव्ही, रेडिओ शिवाय फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम असा सगळा सोशल मीडिया टपून बसलेला असतोच. पुष्कळदा हातातली कामं overwhelming झाली की ती सोडून आपण "टाईमपास" म्हणून मीडियाकडे वळतो, आणि मग त्यात किती वेळ घालवतो ते समजतही नाही. सोशल मीडियावर सगळ्यांचे "feel good" फोटो आणि पोस्ट्स बघून तर घशात अव्याहत एखादा अशक्य गोड घास अडकल्यासारखं वाटत राहतं. पण मग त्याचीच चटक केव्हा लागते लक्षात येत नाही. टाईमपास म्हणून टीव्ही, सिनेमे पाहणं ही तर आपली सर्वांची जुनीच सवय! त्याच त्या स्टोऱ्या वेगवेगळ्या सिरियल्समधून "रटाळ-कंटाळवाण्या" म्हणत आपल्यापैकी बरेचजण चवीनं पाहत असतील. ह्याचंच दुसरं टोक म्हणजे एकामागून एक पुढे वाढून ठेवलेली कामं नुसती mindlesslyउरकायची. पुरेसा विचार करायचा नाही. किंवा कामांचा इतका ढीग स्वतःवर ओढवून घ्यायचा की मनात कोणतेही विचार यायला वाव द्यायचाच नाही.
आपल्या रोजच्या जगण्यात जे जे काही ताणतणाव असतील त्यातून सुटका मिळते म्हणून आपण हे वेगवेगळे मार्ग शोधत असतो. एखादी परिस्थिती जवळजवळ आपल्या हाताबाहेर आहे असं जेव्हा आपल्याला जाणवतं तेव्हा हेच ताण अशक्य कोटीतले असतात, आपल्याला सहन होईनासे होतात.  अशा वेळी गाडी अडकते. आतापर्यंत आपण शोधलेल्या या सगळ्या पळवाटा एक-एक करून बंद होऊ लागतात आणि उरतो तो फक्त आपला stress आणि त्यापायी धावपळ करून दमलेला आपला जीव. मग चिडचिड, जवळच्या व्यक्तींवर राग काढणं हे ओघानं आलंच. आणि हे नेहमीचं होतं तेव्हा आपण आपली नातीही गमवायला लागतो.

हे सगळं मी खूप third person मधे बोलतेय नं? मुद्दामच. खरं तर वर लिहीलंय त्यापैकी निदान ८०% गोष्टी तरी मी अनुभवल्या आहेत.. अगदी नाती दुरावण्याइतकी वेळ आली नाही अजून...  पण गेल्या वर्षभरापासून याआधी कधी नव्हता एवढा ताण आमच्या कुटुंबावर आहे. तो इतक्यात जाणार नाही हेही clear आहे. त्यासहित कसं जगायचं हे शिकावं लागतंय. बऱ्याचदा सगळं अगदी नको नको झालं की मग टीव्हीवर काहीतरी फालतू बघणे, उगीचच फेसबुकवर वेळ घालवणे, घरात विनाकारण चिडचिड हे सगळं माझ्याकडून व्हायला लागतं. Lately, तन्मयीच्या तब्येतीचे up-down जरी कमी झालेले असले, तरी तिच्याच संबंधाने छोट्या छोट्या गोष्टी ज्या सतत कराव्या लागतात त्याचाच ताण खूप होतो. उदा. तिची औषधं order करायला अर्धा-अर्धा तास ३-४ वेगवेगळ्या फार्मसीशी फोनवर वेळ घालवणं असो की तिच्या ५ वेगवेगळ्या थेरपीच्या वेळांचा track ठेवणं असो... त्यातच ऑफिसमध्ये एखादी deadline असते. या सगळ्या छोट्या पण न संपणाऱ्या गोष्टी अंगावर येऊन शेवटी मी जवळपास autopilot mode वर जायला लागते. अशातच मग एखाद्या दिवशी तन्मयीनं थेरपी सेशनमध्ये जे करायला पाहिजे ते केलं नाही, किंवा नीट जेवलीच नाही की मग अचानक autopilot mode off होतो, आतापर्यंत ज्याकडे दुर्लक्ष केलं तो सगळा ताण डोकं वर काढतो आणि मी hyper-tense mode मध्ये जाते.

अशा मनःस्थितीत एकतर दिवस सरता सरत नाहीत असं वाटतं किंवा ते इतके पटापट पुढे सरकतात की आपण नक्की रोज करतो तरी काय असा प्रश्न स्वतः स्वतःलाच पडावा. मला खात्री आहे की लहान मुलं ज्यांच्या घरात असतील ते एकमतानं मान्य करतील की दिवसभरात वेळ कसा निघून जातो ते अजिबात समजत नाही. माझंही तसंच आहे. आठवड्यातून मी हल्ली जास्तीत जास्त ३ दिवस प्रत्यक्ष ऑफिसला जाते. कधी तन्मयीची डॉक्टर अपॉइंटमेंट असली की तितकंही ऑफिसला जाणं होत नाही. घरी असले की अगदी क्वचितच सलग बसून काम करता येतं. बहुतांशी वेळ तन्मयीभोवती नाचण्यात जातो. त्यात एखाद्या दिवशी असा hyper-tension वाला mood असला की सगळं अगदी वेगाने माझ्या हाताबाहेर जात असल्याची भावना अनावर होते. कोणत्याही एका गोष्टीवर मन टिकून राहात नाही. सगळ्या गोष्टी कशा half-heartedly केल्या जातात. आणि मला मुळातच ते आवडत नसल्यानं स्वतःचाच राग येतो. मुख्य म्हणजे दिवसाच्या शेवटी मन अत्यंत असमाधानी असतं. दिवस नुसता वाया घालवल्यासारखं वाटत राहतं.

साधारण तीन महिन्यांपूर्वी एके दिवशी अशीच hyper झाले होते तेव्हा मी स्वतःलाच प्रश्न विचारला - या सगळ्यावर उपाय काय? कारण हे अशा प्रकारचं वागणं हे sustainable नाही. Stress management ही मुळातच तशी tricky गोष्ट आहे. अगदी सध्या माझ्यावर आहे तसा असाधारण ताण वगळून बोलायचं झालं तरी रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींचे ताणसुद्धा आपल्याला पुरून उरतात. त्यामुळं stress management ही सर्वांनी शिकून घ्यावी अशीच गोष्ट आहे.

Anyway, इथं त्याविषयी नाही, तर माझ्यावरचा असाधारण ताण कमी करायला मी काय प्रयत्न करतेय हे थोडंसं मांडायला आज हे लिहायला घेतलं. माझ्यावरच्या मानसिक ताणाशी मुकाबला करायचा तर मला सगळ्यात महत्त्वाचं अस्त्र जे वाटलं ते म्हणजे The Art of Slowing Down. फार विचार न करता, autopilot वर रोजची तीच ती कामं करत राहण्यानं माझं फारसं काही भलं होताना मला तरी दिसत नव्हतं. त्यामुळं रोजची शारीरिक धावाधाव चुकत नसली तरी दिवसातले काही क्षण आपल्या मनाची गती कमी करून पाहायचं ठरवलं. कारण ज्या वेगानं शरीर काम करतं त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त वेगानं आपलं मन धावत असतं. त्याला लगाम घालून थोडं शांत करण्यासाठी फार काही नाही, तर चार छोट्या-छोट्या युक्त्या मी वापरल्या त्या तुम्हाला सांगते. ज्यांना थोड्याशा गोष्टींनीसुद्धा खूप tense व्हायला होतं त्यांना तर याचा नक्की फायदा होईल.

१. आकडे मोजणं.
     लहान असताना आपल्यापैकी बहुतेकांच्या आई-वडिलांनी आपल्याला हे सांगितलेलं असतं, "राग आला की १० पर्यंत आकडे मोजायचे, मग बोलायचं." त्यामागचा हेतू एवढाच की रागाच्या भरात आपल्याला पुढे पश्चात्ताप होईल असं चुकीचं काही बोललं जाऊ नये. हीच युक्ती stress साठी वापरायची. जेव्हा जेव्हा tension यायला लागतं तेव्हा त्याच क्षणी अगोदर १० पर्यंत आकडे मोजायचे आणि मग त्या तणावाला सामोरं जायचं. एकाग्रतेनं १० पर्यंत आकडे मोजताना समोर येणाऱ्या stress साठी आपलं मन बरोब्बर तयार होतं. एक मात्र आहे, आकडे मोजताना आपलं लक्ष पूर्णपणे त्या आकडे मोजण्याकडे हवं.

२. One-sentence Journal
     रोज रात्री एखाद्या छोट्या वहीत/डायरीत त्या-त्या दिवसाविषयी एका वाक्यात लिहायचं. फार फार तर २ वाक्यात. याचा मला जाणवलेले फायदे दोन. एक तर एकच वाक्य लिहायचं म्हणून आपण खूप selective होतो. म्हणजे उगीचच वाटेल त्या गोष्टींनी पानंच्या पानं भरत बसत नाही. आणि दुसरं म्हणजे ते वाक्य लिहिल्यावर त्या दिवसातून नक्की काय घेऊन पुढे जायचंय हे आपलं आपल्यालाच स्पष्ट होऊन जातं. उदा. आजच तन्मयीचा दिवस खूप वाईट गेला. म्हणजे ती खूप रडली, किरकिरली, नीट जेवली नाही, ओकली इ. मीपण दिवसभर खूप त्यामुळे stressed out होते. पण at the end of the day जेव्हा मी एक वाक्य लिहायला घेतलं तेव्हा माझ्याकडून हे लिहिलं गेलं की "आज तन्मयीच्या वाईट दिवशी मी तिच्या सोबत होते." हे लिहिल्या लिहिल्या माझा दिवसभराचा ताण कुठच्या कुठे पळून गेला!

३. Focus on Transitions
     एका कामाकडून दुसऱ्या कामाकडे वळताना स्वतःच्या मनाशी स्पष्ट विचार करायचा की आपण कोणतं काम नुकतंच संपवलं, आणि आता आपण कोणत्या कामाकडे वळतोय. उदा. स्वयंपाक संपवून मी जेव्हा ऑफिसच्या कामासाठी लॅपटॉप उघडते तेव्हा मी स्वतःला तसं सांगते. यामुळं आपलं लक्ष कायम समोर असणाऱ्या कामाकडे राहतं. ही युक्ती अमलात आणणं जरा अवघड आहे, कारण आपण पुष्कळदा multitasking करत असतो. पण शक्य असेल तेव्हा हे केलं तर नक्कीच फायदा जाणवतो.

४. Low Power Mode वर जाणे
      आपल्या फोनची बॅटरी कमी असली की तो कसा "power save" mode वर जातो, तसं आपणही जायचं. किती frequently आणि किती वेळासाठी हे आपापल्या गरजेनुसार आहे. माझ्यासाठी सहसा low power mode ची वेळ म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आंघोळ होऊन fresh होईपर्यंत. या वेळात मी कुणाशी बोलत नाही, की फोन बघत नाही. फक्त उठून माझं माझं आवरते. एखाद्या दिवशी ताण असह्य झाला तर मी दिवसाच्या मधेच थोडा वेळ ह्या mode मध्ये शिरते. जरा fresh वाटलं की परत नेहमीच्या कामांना लागते.

गेल्या तीन महिन्यांपूर्वीपासून जमतील तशा मी ह्या चार गोष्टी सुरु केल्या आहेत. ताण कमी होत नसला तरी तो handle करण्याची माझी शक्ती नक्की वाढताना मला जाणवतेय. गरज पडली तर हे उपाय तुम्हीही करून बघू शकता... पाहा काय फरक पडतो ते! Cheers!





Comments

  1. I completely empathize with the situation and agree with the methodology. I have also implemented a few of these points, I will introduce the One-Liner in my life, I tend to go verbose while writing about the day. A tight hug and / or holding of hands helps a lot, too. Those quiet moments. Even Neeraj´s photographs have a therapeutic effect on me. I first tried the App "Calm" and then realized, we have our own app designed within, which we need to download :-). Love you.

    ReplyDelete
    Replies
    1. So true! I had heard a lot about "Calm," but when I gave it some serious thought I realized it would just make me stick more to my phone when I really need to get away from it.

      Delete

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *