Working with a Child with Special Needs

तन्मयी जशी मोठी होतेय तशी एक गोष्ट मला खूप प्रकर्षानं जाणवते, ती म्हणजे फार कमीजणांना तिच्याशी interact करता येतं. बहुतेकांना काय करायचं ते माहीतच नसतं! काहीजण खूप प्रयत्न करून थोडावेळ तिच्याशी engage होतात, काही प्रयत्नही करत नाहीत आणि काहीजण तेच-तेच बोलत राहतात किंवा ती छोटं बाळ असल्याप्रमाणे तिला वागवतात, तिच्याशी बोबडं बोलतात... अगदी आमच्या कुटुंबातल्या काहींनादेखील अनावधानाने असं वागताना मी पाहते. पण आज मी याप्रकारचे मला काय अनुभव आलेत त्यांना बगल देऊन काही basic मुद्दे थेट मांडणार आहे. तन्मयीसारख्या मुलांशी कसं वागा-बोलायचं यासाठीच्या काही tips आहेत. तुमच्या ओळखीत कुणी असं असेल तर त्यांच्याशी वागताना, संवाद साधताना हे नक्की आठवा, तसेच वागा आणि आपल्या मुलांनाही शिकवा.

१. या मुलांशी त्यांच्या वयाला साजेशी भाषा वापरूनच बोला. 
एखाद्या ५ वर्षांच्या मुलाला स्वतःहून communicate करता येत नाही याचा अर्थ असा नव्हे की त्याला काहीच समजत नाही. सहसा react करता न येणे हे आपण फक्त लहान बाळांमध्ये बघतो, त्यामुळे तीच फूटपट्टी special needs मुलांना लावली जाऊ शकते. त्यानं या मुलांना फायदा तर होत नाहीच, पण तोटा मात्र होऊ शकतो. कोणत्याही मुलांना त्यांच्या बरोबरीच्या मुलांप्रमाणे वागवलेलं केव्हाही आवडतं. तोच नियम इथंही लागू होतो हे विसरू नका.

२.बोलताना स्पष्ट, सावकाश आणि प्रामाणिकपणे बोला. 
एका ठराविक वयानंतर बोबडं बोलू नका. संथ बोललेलं एकवेळ चालेल पण उगीचच लाडं-लाडंही बोलू नका. काही मुलांशी ठराविक शब्द (cue-words) वापरून बोललं तर त्यांचं लक्ष लवकर वेधून घेता येतं. असे काही शब्द किंवा वाक्यं असतील तर ती आम्हा आई-वडिलांना विचारून घ्या. मूल तुमच्या बोलण्याला reaction देतेय असं वाटलं आणि तुम्हाला ते समजलं नाही तर तसं स्पष्ट त्या मुलाला सांगा.. एखाद्या मोठ्या समजूतदार व्यक्तीला सांगाल तसं! मुलांना already आपल्याला संवाद साधता येत नाही याचं frustration असू शकतं, त्यात आपण भर तर घालत नाही आहोत नं याकडे लक्ष ठेवा. सुरुवातीला या सर्वाचा समन्वय साधणं निश्चित अवघड जाईल. तेव्हा आम्हा आई-वडिलांची मदत घ्या. आमच्याशिवाय आमच्या special मुलांना इतकं जवळून कुणीही ओळखत नसतं.

३. They are a child. Not a disability.
कोणाचीही disability इतकीच त्यांची ओळख नसते. आपल्याप्रमाणे तीही माणसंच आहेत हे विसरू नका. सतत त्यांच्यासमोर त्यांची "development", "प्रगती" याविषयी बोलायची गरज नसते.

४. मुलांची दखल घ्या. 
एखाद्या खेळणाऱ्या-बागडणाऱ्या, छान नाच करून दाखवणाऱ्या, गाऊन दाखवणाऱ्या, प्रश्न विचारून हैराण करून सोडणाऱ्या मुलांची जशी दखल घ्याल तशीच बोलता न येणाऱ्या, संवाद साधता न येणाऱ्या, दृष्टीनं अधू असणाऱ्या, नजरेला नजर मिळवू न शकणाऱ्या आणि इतर कोणत्याही प्रकारे अधू असणाऱ्या सर्व मुलांचीही दखल घ्या. त्यात हयगय नको. आजूबाजूच्या इतर मोठ्या माणसांशी गप्पा मारताना मधेच इतर मुलांशी बोलाल, तसेच या मुलांशीही बोला. तुमच्या अधू नसलेल्या मुलांना घ्याल तसं त्यांनाही गप्पांमध्ये सामील करून घ्या. समोर असून नसल्यासारखे वागवू नका. त्यांच्यासमोर त्यांच्याचविषयी इतरांशी एका मर्यादेपलीकडे बोलू नका. दाखवू शकत नसली तरी ही मुलं सर्व ऐकत असतात.

५. निरीक्षण करा. त्यासाठी डोळे आणि मन उघडे ठेवा. 
special needs असलेल्या प्रत्येक मुलाची शिकण्याची, संवाद साधण्याची पद्धत वेगवेगळी असते. तुम्हाला ज्याच्याशी नातं घट्ट जोडायचंय त्या मुलाला काय लागतं ते सतत उघड्या डोळ्यांनी पाहा. त्यांच्याशी त्या त्या पद्धतीनं खेळ, गप्पा मारा. समजलं नाही तर त्याच्या आई-वडिलांना विचारण्यात कोणताही कमीपणा नाही हे लक्षात ठेवा. एखादी गोष्ट तुम्ही चुकीची करताय असं आम्ही आई-वडिलांनी सांगितलं तर नक्की ऐका. त्यात तुमचा अपमान करण्याचा हेतू नसून मुलाशी तुमची गट्टी जमवण्यासाठीची ती strategy असते.

६. Be a regular in the child's life.
तुम्ही जितक्या frequently मुलांना भेटाल तितके तुम्ही मुलांच्या लक्षात राहाल. आणि जितक्या नियमितपणे त्यांच्याशी खेळाला तितकी तुमची लवकर गट्टी जमेल.

७. दयादृष्टीने (pity) या मुलांकडे बघू नका. 
"आहे तसा आपला आहे" किंवा "तुझ्याकडे सगळं आहे त्याची किंमत ठेव, तिला बघ साध्या साध्या गोष्टींसाठी किती कष्ट पडतात" ही अशी दयावाचक वाक्यं आपल्या विचारातून एकेककरुन वेचून कचऱ्यात फेकून द्या. तुमच्या नुसतं मनातही असं काही असलं तर तुम्ही न बोलताही तुमच्या वागण्यातून ते आम्हा आई-वडिलांना जाणवत असतं. आमच्या मुलांनाही ते जाणवतं. आणि मग तुमची आमच्याशी दोस्ती होणं अवघड होऊन जातं.

८. Have patience. 
Disability असलेल्या मुलांची नस सापडायला आणि त्यांच्या आवडी-निवडी समजून घ्यायला इतर मुलांपेक्षा जास्त वेळ लागतो हे सत्य आहे, त्यासाठी थोडा patience ठेवा. पाहता-पाहता तुम्ही त्या मुलांचे आणि त्यांच्या आई-वडिलांचे आवडते होऊन जाल, आणि तुमच्याही नकळत तुम्हाला खूप गोड मित्र किंवा मैत्रीण मिळेल.





Comments

Contact Me

Name

Email *

Message *