Raising a Special Needs Child and Slow Living

कोरोनामुळे सध्या आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्याचा वेग मंदावलाय. रोज उठून असलेली लगबग, दैनंदिन गोष्टी पार पाडण्याची असलेली घाई, ट्रेन पकडणे, मुलांना शाळेत सोडणे/आणणे, ऑफिसला जाणे, डेडलाईन्स सगळं सगळं बंद. परवा माझ्या बहिणीशी बोलत असताना सहज हा विषय निघाला तशी ती पटकन बोलून गेली की या प्रकारचं संथ आयुष्य सर्वांसाठी आवश्यक झालं होतं... विशेषतः उच्च मध्यमवर्गीयांत बोकाळलेल्या कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी उपभोग घेण्याच्या प्रवृत्तीतून एक प्रकारे recuperation किंवा recovery होण्यासाठी. तिचं मला बरचसं पटलंच. त्यावर विचार केला तसं जाणवलं की अगदी साधं आयुष्य माझ्या पिढीनं अनुभवलेलं नाही असं नव्हे. पण आर्थिक स्तर आमचा आमच्या आधीच्या पिढीपेक्षा जरा जास्त लवकर उंचावल्यानं आणि बाहेर खाणे-पिणे, सिनेमा-नाटकं अशी ऐहिक सुखं पूर्वीपेक्षा अगदी सहज उपलब्ध असल्यानं उपभोगाकडे वळणं आमच्यासाठी सोपं होतं. कोरोनामुळे जबरदस्ती घरात बसावं लागल्यावर यातल्या बऱ्याच गोष्टींना आळा बसला आणि रोजच्या दिनक्रमातला वेगच नाहीसा झाला. 

हा वेगच खरं तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करू देत नाही. आपण एखादी गोष्ट का करतोय, कधी करतोय, तिचा अतिरेक होतोय का, आपल्यासमोर एखादी गोष्ट घडतेय ती चुकीची की बरोबर , त्या बाबतीत आपण काही करायला हवं का, आपण ज्यांना आपलं मानतो त्यांच्याशी आपण शेवटचं केव्हा बोललो होतो, या आणि अशा so-called serious गोष्टींचा विचार करण्याची क्षमता बहुतेक सर्वांच्यात असते. पण ती क्षमता तशीच धूळ खात पडते कारण रोज वेळ कुणाकडे आहे या सर्व गोष्टींचा विचार करायला! जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मन-शरीर-मेंदू सर्वकाही इतकं प्रचंड थकलेलं असतं की या गोष्टींना थारा द्यायला शक्ती पुरत नाही. विचार झाले तरी अर्धेमुर्धे आणि मग त्यावर कृती करण्यासाठी ताकद नसते. त्यामुळे eventually हे विचार राहतात बाजूला आणि सहजसोप्या मनोरंजनाकडे आपण वळतो. मीही ४-५ वर्षांपूर्वी मुंबईत राहत होते तेव्हा याच गोष्टीत अडकले होते. किंबहुना अगदी १-१.५ वर्षापूर्वीपर्यंतही रोजच्या दगदगीत माझ्याकडून खूप गोष्टी राहून जात होत्या असं मी म्हणेन. तन्मयीचं diagnosis मिळालं आणि आमच्या घरात जगण्याचा वेग अगदी मंदावला. सर्वांना आज जो एक pause घ्यावा लागतोय, तो आमच्याकडे स्वतःहून २ वर्षांपूर्वी चालून आला. आमची आमच्यापुरती "slow life movement" तेव्हाच सुरु झाली. 

स्पेशल मुलं वाढवताना वरकरणी पाहता दिवस अत्यंत वेगवेगळ्या कामांनी भरल्यासारखा वाटतो. म्हणजे माझ्या बाबतीत म्हणायचं तर आम्ही दोघेही ऑफिसला असतो त्या दरम्यान काही तास तन्मयीला सांभाळायला आम्ही एका बाईला बोलावतो. पण तन्मयीच्या औषधांची सोय, तिचा Ketogenic diet वाला वेगळा स्वयंपाक, आमचं ऑफिस, तिला सांभाळणारी बाई गेल्यावर उरलेल्या वेळातल्या तिच्या activities, तिच्या डॉक्टर appointments अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींनी दिवस भरलेला असतो. पण या प्रत्येक गोष्टीत एक प्रकारचा थंडपणा आहे. दिवस कसा संपतो समजत नाही, पण त्यातल्या प्रत्येक मिनिटात माझं मन हजर असतं, aware असतं. तन्मयीच्या वेगवेगळ्या therapies मध्ये सहभागी होताना डोळ्यात तेल घालून तिच्या प्रत्येक हालचालीचं निरीक्षण करणं, त्याची मनात नोंद करून ठेवणं, त्याविषयी नंतर आपापसात किंवा थेरपिस्टशी चर्चा करायची वेळ आली की योग्य ते तपशील आठवणं या सगळ्यात मनाला आणि एकूणच विचारांना एक प्रकारची शिस्त कधी लागत गेली ते समजलंच नाही. खरंतर तिच्या activities आणि  खेळ तिच्या मेंदूला भारंभार चालना देत असले तरी आपल्यासारख्या मोठ्यांसाठी अत्यंत संथ आणि कंटाळवाणे आहेत. आता तर तन्मयीसोबत कोणतीही activity करताना तिच्याइतकी मीसुद्धा त्यात गुंगून जाते. पण ही झाली अगदी अलीकडची गोष्ट. गेल्या वर्षअखेरीपर्यंत ती खाली झोपत नाही म्हणून मांडीवर तिला तासनतास घेऊन एका जागी स्वस्थ बसावं लागायचं. ती खाली झोपत नाही याचा वैताग यायचा, पण एकदा का ती मांडीवर गाढ झोपली की खोलीतल्या त्या अंधारात करण्यासारखं इतर काहीच नसायचं. ते तसं जबरदस्तीनं  स्वस्थ बसणं... पण आपोआपच दिवसभरात काय धावपळ व्हायची त्याचा मनाला आलेला शीण पळून जायचा. रोज निवांत ५ मिनिटं स्वस्थ स्वतःकरता बसावं असं का म्हणतात हे तेव्हा जितकं समजलं तितकं आधी कधीच समजलं नव्हतं. तन्मयीसोबतच्या activities, हे असं झोपवायला घेऊन बसणं या सर्वांमुळं जबरदस्तीनं मंदावलेला आयुष्याचा वेग आता माझ्या विचारातही झिरपलाय. नकळत mindfulness येऊ लागलाय. एखाद्या घडणाऱ्या कठीण प्रसंगात आपल्या विचारांचं भान राखणं, नको ते विचार बाजूला सारून द्यायला जमू लागलंय. मघाशी उल्लेख केला त्या सर्व serious विचारांसाठी डोक्यात जागा आता शिल्लक असते असं अधून मधून जाणवतं. त्याला मी 'mental bandwidth' असं नावही देऊन टाकलंय. या सगळ्याखेरीज गेल्या दोन वर्षांत गाणं आणि वाचनासाठी हळूहळू विचारपूर्वक रोजच्या दिनक्रमात आणि विचारांत मी जागा निर्माण करत आलेय तीही आता जवळपास पक्की झाल्यात जमा आहे. 

सध्याच्या परिस्थितीत आम्हा दोघांच्याही नोकऱ्या शाबूत आहेत त्यामुळे आम्ही सुदैवी आहोत. ऑफिसात जाण्याऐवजी घरून काम करतोय. पण त्याव्यतिरिक्त कोरोनामुळे झालेल्या quarantine मध्ये आमचा आधीच दिनक्रम फारसा बदलला नाही तो आमच्या वाट्याला खूप आधीच आलेल्या slow life मुळे अशी माझी पक्की खात्री आहे.
_____________________________________________________

तन्मयीच्या काही संथ activities चे फोटो उदाहरण म्हणून इथे देतेय... 
गोष्ट वाचताना... एक एक पान जवळजवळ मिनिटभर दाखवून ती त्याकडे बघतेय की नाही हे पाहावं लागतं.
त्यामुळे एकच १० पानी पुस्तक वाचण्यात  १५-२० मिनिटं सहज जातात. 



तिला असं कमीत कमी आधार देऊन उभी केली की तिचं सर्व लक्ष स्वतःचं शरीर सांभाळण्याकडे जातं.
त्यामुळे ती इतर कोणत्याही खेळात मन गुंतवू शकत नाही. पण ३०-३५ मिनिटं अशी उभी राहते. 


दृष्टी कमकुवत असल्यानं तिच्यासाठी vision therapy सदृश activities पण असतात त्यातली ही एक. 
एका LED lightpad समोर अशी चित्रं ठेवून सोबत प्रत्यक्ष त्या वस्तूला तिच्या हातानं स्पर्श करून त्याचा एकत्रित अनुभव तिला देणं.
वस्तूचा वास देता येण्यासारखं असलं तर तेही यात आलं. 
अशी वेगवेगळी चित्रं पाहण्यात आणि वस्तू हाताळण्यात, समजावून घेण्यात साधारण अर्धा तास कसाही निघून जातो. 



आत्तापर्यंत तिच्या योगासनांसाठी मी तिला बऱ्यापैकी famous केलंय !
त्यातही हल्ली तिचा स्टॅमिना वाढल्यानं ती एक-सव्वा तास योगासनं करून घेऊ देते.

 















Comments

Contact Me

Name

Email *

Message *