सत्य

 

नि:शब्द नीरव अवस्थेतही स्पंदणाऱ्या मनाला आज कंठ फुटला
सरसरून अंगावर काटा यावा अशा
अंतिम सत्याच्या जाणिवेला
घट्ट धरून ठेवलं होतं त्यानं
हे असंच होतं त्याचं आताशा…

हवे ते घडत नाही, नको ते समोर येते
सतत, दात विचकत चिडवते, रडवते
त्याच सत्याची सावली
जागेपणी मरण… पावलोपावली

एका धिटुकल्या शरीरानं स्वत:शीच पुकारलेलं बंड पाहताना
आपण आतल्याआत फुटून तुटून जाऊ नये म्हणून 
आहे-नाही ते बळ एकवटून
घट्ट पाय रोवून उभं राहतंच की ते एरवी

बांध त्याचाही फुटणारच मग
त्यात नवल कसलं! 
मायेचं शरीर दूर जाताना घुटमळतात पावलं
तरी त्यात अडकतं ते मनच

स्वत:शीच विचार करत बसतं 
काळाला अडवणारे आपले हात, 
डोळे आणि हृदय इथंच ठेवून जाता आलं तर…?
पण मग जाणवतं…
हे सर्व आपल्या हातात थोडंच असतं!

अंतिम नसलं तरी 
तो म्हणतो तेही एक सत्यच आहे -
“होणारं आपण थांबवू शकत नाही.
हृदय पिळवटून प्रेम करताना 
सहवासाची गरज नाही.

मनानं सोबत असलो 
तर जगण्याला अर्थ आहे…
नाहीतर शरीरं समोर न् मनं कोसांवर
अशांची इथं काय कमी आहे!”

- मधुरा 

Comments

Contact Me

Name

Email *

Message *